व्यासपीठाची सजावट

decoration
व्यवसायाचे नाव ऐकल्याबरोबर आपल्या मनात प्रश्‍न निर्माण होईल की हा काही व्यवसाय होऊ शकतो की काय पण आपल्याला कल्पना नसेल की हा व्यवसाय फार मोठा आहे. भरपूर पैसे मिळवून देणारा आहे. मात्र त्यामध्ये आपली गुंतवणूक काही नाही. केवळ आपली कला तिथे उपयोगाला पडणारी आहे. आपण अनेक कार्यक्रमांना हजर राहतो. तिथे आपण व्यासपीठाची आणि सभागृहाचीसुध्दा सजावट केलेली पाहतो. आपण ती काही सजावट बघायला गेलेलो नसतो. आपला हेतू कार्यक्रम पाहणे किंवा ऐकणे हा असतो. त्यामुळे काही अपवाद वगळले तर आपल्यासारखे सामान्य लोक व्यासपीठाच्या आणि सभागृहाच्या सजावटीकडे फार बारकाईने पाहत नाहीत. मात्र आपण त्याकडे पहायला लागलो आणि त्या सजावटीवर किती खर्च झाला असेल याचा अंदाज करायला लागलो तर आपल्याला असे लक्षात येईल की तिच्यावर हजारो रुपये खर्च झालेले असतात आणि ती सजावट करणार्‍या कलाकारालाही मोठी कमाई होत असते. व्यासपीठावरच्या सजावटीत आधी कार्यक्रमाचे नाव, पाहुण्यांची नावे अशी बॅक कर्टनवर म्हणजे व्यासपीठाच्या मागच्या पडद्यावर लिहिली जातात. त्याचे दोन-तीन प्रकार आहेत. सरळसरळ ही एका कापडावर ही नावे लिहून ते कापड पडद्यावर लावणे. त्याशिवाय डिजिटल फलक तयार करून तो लावणे आणि थर्माकोलची अक्षरे कापून त्यातून तो पडदा सजवणे. सजावटीची सुरूवात येथून होते. हे मागच्या पडद्यावरचे नाव साध्या पध्दतीने न घेता त्यात काही कलात्मक प्रकार केला तर ते नाव लोकांच्या नजरेस भरते. त्या नावाच्या सोबत काही चित्रे टाकली किंवा सूचकपणे काही स्केचेस केले तर ते अधिक उठावदार दिसते. यासाठीच खूप पैसे घेतले जातात. अनेकदा मागच्या पडद्यावर फुलांची आरास केली जाते आणि त्यासाठी हजारो रुपयांची फुले वापरली जातात. त्यातही कलात्मकता दाखवता येते.

एकदा मागचा पडदा रंगवला की व्यासपीठावरची बैठक व्यवस्था कशी असावी यावरही बरेच डोके लढवता येते. काही वेळा व्यासपीठावर एक टेबल मांडून पाहुण्यांना बसायला खुर्च्या दिल्या जातात. सामान्यतः एखाद्या व्याख्यानाचा कार्यक्रम असेल तर ही व्यवस्था ठीक असते. परंतु काही वेळा भारतीय बैठक मांडली जाते आणि पाहुण्यांच्या समोर टेबलाच्या ऐवजी छोटे स्टूल ठेवले जातात. मग ठेवलेले स्टूल उत्तम कपड्याने झाकले जाणे, वेळ पडल्यास त्या कपड्यावर काहीतरी रंगवणे आणि त्यावरील फुलदाण्यातली फुले व्यवस्थित बसवणे याही गोष्टी कलात्मकतेने केलेल्या असतात. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने होते. परंतु त्यासाठी ठेवलेला दिवा अनेकदा छान सजवलेला असतो. तिथेही कल्पकता दिसते. दिव्याच्या मागे सरस्वतीचा फोटो असतो किंवा कोणातरी महनीय व्यक्तीची प्रतिमा ठेवलेली असते. त्यासाठी वापरलेली खुर्ची किंवा टेबल यांची सजावट हासुध्दा एक कलेचाच भाग असतो. एखादेवेळी एखादा कलाकार दीपप्रज्वलनाची नवी युक्ती योजतो आणि पाहुण्यांना बसल्या जागेवरून दीपप्रज्वलन करता येते. एखाद्या गोष्टीचे उद्घाटन करतानासुध्दा असेच बसल्या जागेवरून कळ दाबून किंवा पडदा समोरून सरकवून अशा वेेगवेगळ्या पध्दतीने करता येते. या सगळ्या गोष्टीत कल्पकताच वापरायची झाली तर आलेल्या श्रोत्यांचे स्वागतसुध्दा एखादे फूल देऊन केले जाते. कार्यक्रमाच्या सभागृहाच्या दारातसुध्दा कमान उभारणे, कार्यक्रमाची माहिती देणारा फलक लावणे, प्रवेशद्वारात छानपैकी रांगोळी काढणे हेही प्रकार केले जातात. एखाद्या कार्यक्रमाला गर्दी होते. सभागृह अपुरे पडते. तेव्हा श्रोत्यांना सभागृहाच्या बाहेर बसून कार्यक्रम ऐकता आणि पाहता यावा यासाठी काही सोयी केल्या जातात. याही व्यवस्था याच व्यवसायाचा एक भाग असतो.

सभागृहाची आणि व्यासपीठाची सजावट अनेकानेक प्रकारांनी केली जाते. केवळ कार्यक्रमाचेच व्यासपीठ नव्हे तर लग्न, मुंजी, डोहाळे जेवण, बारसे, वाढदिवस अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने घेतली जाणारी सभागृहे आणि व्यासपीठे आजकाल फार हौसेने सजवली जायला लागली आहेत. या सार्‍या गोष्टी आपण पाहतो परंतु यात एक व्यवसाय दडलेला आहे आणि या व्यवसायातून काही लोक हजारो रुपये कमवत असतात. याची आपल्याला माहिती नसते. तेव्हा जवळ भांडवल तर नाही मात्र व्यवसाय तर सुरू करायचा आहे अशा लोकांना हा एक चांगला व्यवसाय आहे. या व्यवसायातली एक गंमत म्हणजे काही लोकांकडे सजावटीचे साहित्य तयारच असते. अशा लोकांना गाठून आणि कलाकाराशी संपर्क साधून हे सारे सजावट करून देणारा एक व्यवसायसुध्दा असतो. म्हणजे व्यवसाय करणारा स्वतः चित्रकार किंवा पुष्परचनाकार असलाच पाहिजे असे काही नाही. स्वतः कलाकार नसलेली व्यक्ती या सर्वांचा समन्वय साधून सजावटीची कंत्राटे घेऊ शकतो. केवळ समन्वय साधण्यातूनही त्याला चांगले पैसे मिळू शकतात. हा व्यवसाय करण्यासाठी गावात होऊ घातलेल्या कार्यक्रमांवर लक्ष ठेवले पाहिजे आणि एखादा कार्यक्रम जाहीर झाला की त्याच्या आयाेजकाशी संपर्क साधून त्यांच्याकडून हे काम मिळवले पाहिजे. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा घेतल्या जातात. पण त्यातल्या एकेका सभेवर काही लाखांपासून काही कोटी रुपयांपर्यंत खर्च होत असतो. हा खर्च पाहिला म्हणजे हा व्यवसाय किती पैसे देणारा आहे याची कल्पना येते.

Leave a Comment