ज्वालामुखीच्या तोंडावर पश्‍चिम बंगाल

mamta
पश्‍चिम बंगालला हिंसेचे राजकारण नवीन नाही. पूर्वी या राज्यामध्ये मोर्चे, गोळीबार, बॉम्बफेक, दगडफेक, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस या गोष्टी सरसकट होत होत्या. १९६५ नंतरच्या दशकामध्ये पश्‍चिम बंगालला एवढ्या मोठ्या संख्येने युवकांचा असंतोष भडकला होता की त्यामध्ये हातबॉम्बचा वापर हा अगदी सहज आणि नित्याचा झाला होता. याच सुमारास पश्‍चिम बंगालच्या उत्तर भागातील नक्षलबारी या गावातून नक्षलवादी चळवळीचा प्रारंभ झाला. या प्रारंभापासून १९७२ पर्यंत पश्‍चिम बंगाल हे राज्य अक्षरशः जळत होते. मात्र ७२ साली कॉंग्रेसचे तेव्हाचे मुख्यमंत्री सिध्दार्थ शंकर रे यांनी हा असंतोष एवढा प्रभावीपणे हाताळला की नंतर नक्षलवाद्यांनी कधी डोके वर काढले नाही. कॉंग्रेसची सत्ता जाऊन डाव्या आघाडीच्या हाती सत्ता आली. या संधी काळात पुन्हा एकदा बंगालने हिंसाचाराचा आगडोंब अनुभवला. तीन दशके डाव्या आघाडीची होती. ती संपवून तृणमूल कॉंग्रेसच्या हाती सत्ता जाण्याच्या संधी काळातसुध्दा पुन्हा एकदा हिंसक घटनांनी सारे वातावरण भरून गेले. या सततच्या हिंसाचारामुळे पश्‍चिम बंगाल हे राज्य मधली २५ वर्षे वगळता सतत धुमसत राहिले आहे.

आता पश्‍चिम बंगालमध्ये विशेषतः पश्‍चिम बंगालच्या बांगला देशाला लगत असलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवहार, हातबॉम्ब तयार करण्याचे उद्योग आणि नकली नोटा खपवण्याचे शडयंत्र सुरू आहे. त्यामुळे हे राज्य अवैध व्यवहार आणि हिंसाचाराच्या ज्वालामुखीवर बसल्यासारखे आहे. हि सारी कारस्थाने आता आटोक्यात आली नाहीत तर पश्‍चिम बंगालची परिस्थिती कोणत्या क्षणी जम्मू-काश्मीरसारखी होईल याचा काही नेम सांगता येत नाही. राज्यातली कायदा सुव्यवस्था स्थिती हाताळण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. त्यामुळे ही सारी स्थिती बंगालमधल्या तृणमूल कॉंग्रेसच्या ममत बॅनर्जी यांच्या सरकारने हाताळावी अशी अपेक्षा आहे. परंतु केंद्र सरकारच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने राज्यातल्या या स्थितीचा तपास करण्याची जबाबदारी आपल्या हाती घेतली आहे. हा एक प्रकारे राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रातला हस्तक्षेपच आहे. ममता बॅनर्जी यांनीही सुरूवातीला याच शब्दांमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हस्तक्षेपाला विरोध केला होता. परंतु केंद्र सरकारने त्यांचा आक्षेप धुडकावून लावून त्यांना स्थितीचे गांभिर्य लक्षात आणून दिले. त्यामुळे त्यांना आता केंद्रीय यंत्रणेला सहकार्य करण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. कारण घटनाच तशा घडत गेल्या आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ह्या घटनांची मालिका सुरू झाली आहे.

राज्याच्या बरद्वान शहरात दोन मजली घरामध्ये एक बॉम्बस्फोट झाला. पण हा काही घातपात घडवावा म्हणून झालेला स्फोट नव्हता. तर तो एक अपघात होता. या दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर बॉम्ब तयार करण्याचा उद्योग चालत होता आणि तिथे दोन बांगला देशी कुटुंबे रहात होती. ती कुटुंबे तिथे हा उद्योग करीत होती आणि बॉम्ब तयार करताना चुकून स्फोट होऊन त्यातले दोन पुरुष मारले गेले. दोन स्त्रिया आणि लहान मुले बचावली. त्या महिलांच्या चौकशीवरून हे सगळे लोक बांगला देशातले होते हे उघड झाले. या कुटुंबांचा बांगला देशातल्या जमातुल मुजाहिदीन बांगला देश या दहशतवादी संघटनेशी संबंध होता. सीमावर्ती भागातल्या नादिया, मुशीराबाद, पुरोलिया, चोवीस परगणा, बांकुरा, मिदनापूर याही जिल्ह्यांमध्ये बॉम्ब तयार करण्याचा मोठा उद्योग चालतो असे आढळले. पश्‍चिम बंगालचा हा परिसर बांगला देश आणि झारखंड यांच्या सीमांनी वेढलेला आहे आणि या सीमा भागातल्या सगळ्याच जिल्ह्यातील लोकांचे बांगलादेशाशी नित्य सबंध येतात. त्यामुळे बांगला देशातल्या या दहशतवादी संघटनेने बॉम्ब तयार करण्याचा उद्योग बरद्वानमध्ये सुरू केला होता.

इथे तयार होणारे बॉम्ब बांगला देशात पाठवले जाणार होते. त्यातून बांगला देशच्या विविध भागांमध्ये घातपाती कारवाया करण्याची या संघटनेची योजना होती. बांगला देशात जातीयवादी मुस्लीम संघटना मोठ्या प्रमाणावर अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. बांगला देश हा मुस्लीम बहुल देश असला तरी सरकारची धोरणे सेक्युलर आहेत आणि मुस्लीम संघटनांना हा देश मुस्लीम देश व्हायला हवा आहे. अशा संघटनांनी बांगला देश आणि लगतच्या भारतीय प्रदेशात स्वतंत्र इस्लामी देश निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच संघटनांचे हे कारस्थान आहे. तिला नेपाळ, ब्रह्मदेश आणि काही अरबी देशातून मदत मिळते. त्यातून या लोकांनी पश्‍चिम बंगालमध्ये बॉम्ब तयार करण्याचे एवढे घरगुती उद्योग सुरू केले आहेत की त्यामुळे आज पश्‍चिम बंगाल हे राज्य अक्षरशः हातबॉम्बच्या कोठारावर बसलेले आहे असे म्हणावे लागते. २०१३ साली पश्‍चिम बंगालमध्ये ९ हजार बॉम्ब हस्तगत करण्यात आले. त्यातले ७ हजार बॉम्ब बरद्वान, बिरभूम आणि मुशिराबाद या तीन जिल्ह्यातले आहेत आणि २०१४ साली अशाच प्रकारे या तीन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बॉम्ब तयार होत असल्याचे आढळले आहे. २०१२ ते २०१४ या तीन वर्षांत या तीन जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या. ज्या घटनांमध्ये हातबॉम्बचा वापर मुक्तपणे करण्यात आला. या हिंसक घटनांमध्ये १२०० हातबॉम्ब वापरण्यात आले.

Leave a Comment