कर सल्लागार

tax
कर सल्लागार म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो चार्टर्ड अकौंटंट. पण मला चार्टर्ड अकौंटंट या व्यवसायाविषयी काही सांगायचे नाही. चार्टर्ड अकौंटंट हा फार श्रीमंत लोकांचा सल्लागार असतो आणि अशा श्रीमंत ग्राहकांना प्रामुख्याने आयकर आणि अन्य काही महत्वाच्या करांच्या बाबतीत चार्टर्ड अकौंटंटचा सल्ला मिळत असतो. परंतु लघु उद्योजकांना आणि छोट्या छोट्या दुकानदारांना तसेच स्वयंरोजगार करणार्‍या काही उद्योजकांना अनेक प्रकारचे कर लागू असतात. शिवाय काही कायदेही बंधनकारक असतात. अशा कायद्यांचे पालन नीट न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते, त्यांना दंड ठोठावला जातो किंवा वेगवेगळ्या कायद्यांची अंमलबजावणी करणारे इन्स्पेक्टर्स त्यांना सतत त्रस्त करत असतात आणि उद्योगाच्या क्षेत्रामध्ये हे इन्स्पेक्टर राज म्हणजे उद्योजक आणि व्यापार्‍यांची डोकेदुखी ठरले आहे. उद्योगांचा विचार केला असता त्यांना प्रॉव्हिडंट फंड, लेबर लॉ, सुरक्षा विषयक कायदे, कंपनी कायदा, शॉप ऍक्ट, एक्साईज ड्युटीविषयक कायदा अशा अनेक कायद्यांना तोंड द्यावे लागते. काही उद्योगांना अन्न आणि औषध प्रशासनाचा कायदा लागू असतो.

सध्या महापालिकांच्या क्षेत्रांमध्ये जकात कर उठविण्यात आलेला आहे आणि त्याजागी एलबीटी कर लागू झाला आहे. या कराला व्यापार्‍यांचा विरोध आहे. खरे म्हणजे त्यांचा विरोध होण्याचे काहीच कारण नाही. कारण तो कर काही व्यापार्‍यांना आपल्या पदरून द्यायचा नाही. तो ग्राहकांवर बसवायचा आहे आणि महापालिकेला द्यायचा आहे. पण तरीही व्यापार्‍यांचा त्याला विरोध आहे. याचे खरे कारण त्या संबंधातली कागदपत्रे तयार ठेवण्याची कटकट. या कटकटीमुळे व्यापारी त्रस्त असतात. ही अडचण विचारात घेऊन एखाद्या सुशिक्षित तरुणाने एलबीटी कायद्याचा नीट अभ्यास केला आणि त्यानुसार व्यापार्‍यांना त्यांची कागदपत्रे तयार ठेवण्यास मदत केली तर कोणताही व्यापारी अशा तरुणाला या कामाबद्दल सहजतेने काही पैसे देऊ शकेल. आपण व्यापार्‍यांच्या अडचणी नीट लक्षात घ्यायला लागलो की, काही व्यवसाय कसे तयार होतात याचा अंदाज येतो. पूर्वी जकात कर होता किंवा रेल्वेने काही पार्सल अजूनही येतात. असे पार्सल सोडवून आणण्यासाठी व्यापारी स्वत: जाऊ शकत नाहीत. कारण त्यात त्यांचा खूप वेळ जातो. तेव्हा व्यापार्‍यांचे पार्सल्स् सोडवून घेणे आणि त्यांच्यापर्यंत ती पोचती करणे हे काम करणारा हुंडेकरी हा व्यवसाय आपोआपच वाढीस लागला आणि आज हुंडेकरी म्हणून खूप लोक काम करतात.

काही उद्योगांना अबकारी कर लागू असतो. अशा प्रकारच्या करांच्या बाबतीत व्यापार्‍यांना आणि उद्योजकांना सल्ला देणार्‍यांची गरजच असते. सरकारची कर योजना ही सातत्याने बदलत असते. सरकारचे अंदाजपत्रक सादर झाले की, सरकार काही कर सवलती देते आणि काही कर नव्याने लादते. अशीच अवस्था राज्य सरकारचीही असते. सरकार कधी कधी कराचे प्रमाण वाढवते. कोणत्या कर भरण्यानंतर सवलत दिली जावी याचेही निकष सतत बदलत असतात. असे बदल झाले म्हणजे करदाते तर गोंधळात पडतातच पण भले भले कर सल्लागार सुद्धा अर्थमंत्र्यांच्या या तरतुदी नीट समजून घेऊ शकत नाहीत. अशावेळी स्वयंरोजगार करू इच्छिणार्‍या तरुणाने एखाद्या विशिष्ट कायद्यावर लक्ष केंद्रित केले आणि तेवढाच कायदा नीट समजून घेऊन संबंधितांना सल्ला देण्याचा व्यवसाय केला तर तो एक बिनभांडवली स्वयंरोजगार म्हणून चांगला चालू शकतो. काही सल्लागार अशी कामे करतही आहेत.

काही सल्लागार केवळ अबकारी करातच तज्ज्ञ असतात आणि ते संबंधित उद्योगांचे अबकारी करविषयक फॉर्म भरून देण्याचे काम करत असतात. बर्‍याच शहरांमध्ये केवळ प्रॉव्हिडंट फंडाच्या संबंधात सल्ला देणार्‍या मोठ-मोठ्या फर्म निर्माण झाल्या आहेत. एखाद्या व्यवसायाच्या ऑफिसमध्ये जाणे आणि त्यांची या फंडाविषयीची कागदपत्रे पुरी करून देणे. अशा नियमांच्या बाबतीत सातत्याने होणारे बदल लक्षात घेणे. तिथून निवृत्त होणार्‍या कामगारांना फंडाच्या रकमा मिळवून देणे अशी कामे या फर्मचे कर्मचारी करत असतात. तेव्हा प्रॉव्हिडंट फंडाचे सगळे नियम माहीत करून घेतले की, तेच आपले भांडवल होते आणि कसलीही गुंतवणूक न करता आपण प्रॉव्हिडंट फंड सल्लागार होऊ शकतो. अशाच रितीने व्हॅट कर, सेवा कर याही करांच्या संबंधात सल्लागार म्हणून उद्योग उभारता येतो. छोट्या छोट्या उद्योगाचे मालक चार्टर्ड अकौंटंटची सेवा घेऊ शकत नाहीत आणि घेतली तरी त्यांचे हिशेब एका विशिष्ट पद्धतीने लिहिलेले असण्याची गरज असते. धंदा कितीही छोटा असो की मोठा असो त्याची ही गरजच आहे. तेव्हा त्या धंद्याच्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये जाऊन त्यांचे दिवसभरातले हिशेब विशिष्ट पद्धतीने लिहून देणे असा एक व्यवसायच झालेला आहे. या व्यवसायात अनेक लोक गुंतलेले आहेत आणि अनेकांची गरज आहे. नव्या युगातल्या तरुणांना संगणकाचा वापर करून हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येईल आणि त्यातून उत्तम कमाई करता येईल. सध्या सरकारने कित्येक उद्योगांना सेवा कराच्या कक्षेत घेतलेले आहे आणि त्या सर्व उद्योगांना त्या दृष्टीने हिशोब लिहिण्यासाठी अत्यल्प वेळ अकौंटंट हवे आहेत.