सलामीचा सामना कटकमध्ये

cricket
मुंबई – वेस्ट इंडीज संघ माघारी गेल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याकरिता, भारतात पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका खेळण्यासाठी श्रीलंका संघ येत्या ३० ऑक्टोबर रोजी दाखल होत आहे. श्रीलंका संघ मुंबईत दाखल होत असून, ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारत ‘अ’ संघाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट सामना खेळणार आहे.

मालिकेतील पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना खेळण्यासाठी श्रीलंका संघ मुंबईहून कटकला रवाना होईल. २ नोव्हेंबरला कटक येथे श्रीलंका भारत यांच्यात दिवसरात्र सामना होईल.

६ नोव्हेंबरला अहमदाबाद येथे मोटेराच्या सरदार पटेल स्टेडियमवर श्रीलंका-भारत यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना होईल. हा सामनाही दिवसरात्र सामना असेल. ९ नोव्हेंबर रोजी तिसरा एकदिवसीय सामना हैदराबाद येथे होईल.

कोलकाता येथे १३ नोव्हेंबर रोजी होणारा सामना बंगाल क्रिकेट असोसिएशनचा महोत्सवी सामना असेल. महेंद्रसिंग धोनीच्या गावात – रांचीत टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध पाचव्या एकदिवसीय सामन्यात लढेल.

२०१५ ची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा नजरेसमोर ठेवून भारतीय क्रिकेट मंडळाने यापुढे कसोटी सामने न ठेवता सरावासाठी अधिकाधिक एकदिवसीय क्रिकेट सामने ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

असे असतील सामने
३० ऑक्टोबरला श्रीलंका संघाचे भारतात आगमन
०२ नोव्हेंबरपासून वनडे मालिका
०६ नोव्हेंबरला दुसरा सामना
९ नोव्हेंबरला तिसरा सामना
१३ नोव्हेंबरला चौथा सामना
१५ नोव्हेंबरला पाचवा सामना