मुद्रण समन्वय

coordination
पूर्वीच्या काळी छापखाना ही एक छोटी संस्था होती आणि एखाद्या व्यक्तीला तिथे काही छापून घ्यायचे असेल तर फारसा उपद्व्याप करावा लागत नसे. एकदा छापखान्याच्या मालकाला आपला जॉब नेऊन दिला की तो त्या जॉबचे काम पूर्ण करून आपल्या हातात सोपवत असे. परंतु आता मुद्रणाचे अनेक प्रकार तंत्रज्ञानाने विकसित झालेले आहेत आणि काही गोष्टी छापून घेऊन त्या प्रसिध्द करणे, विकणे हा मोठा व्यवसाय झाला आहे. तंत्रज्ञान आणि व्याप्ती या दोन गोष्टींमुळे मुद्रणाच्या व्यवसायामध्ये सहजता आणि सुलभता राहिलेली नाही. सध्या आपल्या देशात फोटो टाईप सेटिंग हा मजकूर कंपोझ करण्याचे नवे तंत्रज्ञान उदयास आले आहे आणि ज्याला कॉम्प्युटर टायपिंग असेही म्हटले जाते. हा व्यवसाय करणारे लोक स्वतंत्रपणे व्यवसाय करायला लागले आहेत. पूर्वीच्या काळी छापखान्यामध्ये खिळ्याचा टाईप असे आणि प्रत्येक छापखान्यामध्ये हा टाईप असणे जरूर होते. पण आता खिळ्याचे छापे बंद झाले आहेत आणि त्यापेक्षा कितीतरी वेगवान आणि कितीतरी सोयीचे हे डीटीपीचे किंवा कॉम्प्युटर टायपिंगचे तंत्र विकसित झालेले आहे. खिळ्याच्या छापामध्ये एकदा मजकूर प्रसिध्द झाला की ते खिळे पुन्हा वेगळे केले जात असत. तोच मजकूर पुन्हा छापायचा झाला तर पुन्हा खिळे जुळवावे लागत. त्यामुळेे ती छपाईची पध्दत महाग होती. आता एखाद्या मजकुराचे कॉम्प्युटर टायपिंग केले की तो मजकूर संगणकामध्ये सेव्ह होतो. तो पुन्हा कधीही वापरता येतो. खिळ्याच्या छापात ठराविक पध्दतीचे आणि वळणाचे खिळे वापरले जात असत. पण कॉम्प्युटर टायपिंगमध्ये कसलाही बदल न करता हजारो प्रकारची अक्षरे आणि शेकडो प्रकारची वळणे वापरता येतात. एखाद्या व्यक्तीने यासाठी कॉप्युटर खरेदी केला तर त्या कॉम्प्युटरवर खिळ्याच्या छापाच्या मानाने कैकपट काम करता येते. म्हणून कॉम्प्युटर टायपिंगचा वेगळा व्यवसाय निर्माण झाला आहे. एखाद्या छापखान्यात एखादे पुस्तक छापायला टाकायचे झाले तर तो छापखान्याचा मालक त्याचे कॉम्प्युटर टायपिंग करेलच असे नाही. तुम्ही कोठूनही टायपिंग करून आणा. छापायचे काम माझे. असे म्हणून तो टायपिंगचे काम तुमच्यावरच सोपवतो.

एखाद्या पुस्तकाच्या छपाईमध्ये कामाची सुरूवात इथून होते. टायपिंग केल्यानंतर पानाचे डिझाईन तयार करून त्यानुसार पाने सेट करणे, पानांवर आवश्यक असणारी चित्रे किंवा स्केचेस टाकणे हे काम करणारा वेगळाच कलाकार असतो. मुख्यपृष्ठ तयार करणारा कलाकार वेगळाच असतो. शिवाय पुस्तकाचे प्रुफरिडिंग करणे, संपादन करणे आणि प्रत्यक्षात छपाई करणे हीही कामे वेगवेगळ्या ठिकाणी चालतात. हे पुस्तक छापून घ्यायचे असेल तर अशारितीने पाच ते सहा व्यक्तींच्यामध्ये समन्वय निर्माण करावा लागतो. शिवाय एखादे पुस्तक कोठे छान छापून मिळेल, त्यासाठी कागद कोणता वापरावा लागेल, रंगीत छपाई करणारे मुद्रणालय कोणते आणि या सगळ्यांच्या माहितीतून सदर पुस्तक कमीतकमी पैशात कसे छापून घेता येईल याची माहिती असावी लागते. एखादी व्यक्ती ही सारी काम छापखान्याच्या मालकावर सोपवायला लागला तर ती छपाई महाग पडते म्हणून अशा या व्यवसायामध्ये छपाईच्या सगळ्या कामांमध्ये उत्तम समन्वय साधणारा एक व्यवसायिक गरजेचा होऊन बसतो. हा समन्वयक कागदाचे प्रकार, कलाकार, चित्रकार, छपाई करणारा छापखाना, प्रुफरिडर या सगळ्याकडे पळापळ करू शकतो आणि सर्वांमध्ये छान समन्वय साधून पुस्तकाची छपाई चांगली, स्वस्त आणि वेळेत करून घेऊ शकतो.

काही लोकांचा अनुभव फार वाईट असतो. त्यांना या सगळ्या तांत्रिक बाबी माहीत नसतात. त्यामुळे त्यांचे कामही चांगले होत नाही, त्यांना प्रत्येक ठिकाणी ज्यादा दर द्यावा लागतो त्यासाठी त्यांना खूप पळापळी करावी लागते आणि फसवणूक होऊनच्या होऊन काम वेळेतही पूर्ण होत नाही. अनेक पुस्तकांच्या प्रकाशनाच्याबाबतीत खूप विनोदी गोष्टी घडतात. एका विशिष्ट वेळेत पुस्तक छापून हाताशी येईल असा अंदाज बांधून प्रकाशनाचा कार्यक्रम निश्‍चित केला जातो, त्याची तारीख जाहीर केली जाते पण कार्यक्रम सुरू होईपर्यंत पुस्तकेच हातात पडत नाहीत. त्यामुळे मग झाले असेल तेवढे पुस्तक कसेबसे रंगीत कागदात गुंडाळून त्याचे प्रकाशन उरकले जाते आणि वेळ निभावून नेली जाते. कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्रोते पुस्तक विकत मागायला लागतात परंतु त्यांची क्षमा मागावी लागते आणि पुस्तक नंतर उपलब्ध होईल असे सांगून आपल्या गैरव्यवस्थापनाचे दर्शन घडते. या गोष्टी टाळायच्या असतील तर छपाईचे काम एखाद्या विशिष्ट कंत्राटदारावर सोपवून दिलेले बरे असते. पुस्तकाच्या लेखकाला किंवा प्रकाशकाला दहा जणांशी संपर्क साधत बसण्यापेक्षा एका अशा कंत्राटदाराशी संपर्क साधला की काम भागते. दगदग कमी होते. आपण अनेक पुस्तके वाचतो पण त्या पुस्तकाच्या छपाईचे आणि प्रकाशनाचे काम किती कटकटीचे असते याचा आपल्याला अंदाज नसतो. पण कटकटीतूनच धडपड्या होतकरू तरुणांसाठी एक नवा व्यवसाय तयार झाला आहे. एकही पैसा न गुंतवता करता येणारा व्यवसाय.