राज ठाकरेंच्या २०३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

manse
मुंबई – राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही सुपडा साफ झाला असून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राज ठाकरेंच्या उमेदवारांनी आता आपले डिपॉझिटही वाचवता न आल्यामुळे मनसेचे राजकीय अस्तित्वच धोक्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तब्बल ३ हजार ७३० उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचविता आले नसल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते, किमान मते न मिळाल्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले आहे.

यात अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. १६८३ अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. यापाठोपाठ बसपच्या २७३ तर मनसेच्या २०३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

आघाडीच्या माध्यमातून राज्यात १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निम्म्याहून अधिक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. राष्ट्रवादीच्या १४८ तर काँग्रेस १४२, शिवसेना ११६ आणि भाजपाच्या ४५ उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अवस्था यात सर्वांत बिकट आहे. या पक्षाच्या तब्बल २०३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

Leave a Comment