पौरोहित्य

puja
हा एक बिनभांडवली धंदा आहे हे कोणीही मान्यच करील. परंतु हे पुस्तक वाचणार्‍या तरुणांना असा प्रश्‍न पडेल की पौरोहित्य हा व्यवसाय केवळ ब्राह्मण जातीसाठी राखीव आहे तेव्हा हा एक बिनभांडवली धंदा म्हणून सूचित केला तर या सूचनेचा लाभ फक्त ब्राह्मण तरुणांनाच होईल पण माझ्या मते असे समजण्याची वेळ आता राहिलेली नाही. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा ताबा पूर्णपणे सरकारच्या हातात आल्यानंतर तिथे देवाची पूजा करणार्‍या पुजार्‍याची भरती करण्याचा प्रश्‍न आला. तेव्हा हे पुजारी केवळ ब्राह्मण नव्हे तर सर्व जातीतून भरले जावेत असा आग्रह धरण्यात आला. सरकार हे सेक्युलर आहे. त्यामुळे सरकारला हा आग्रह मान्य करावा लागला. पुजारी म्हणून काम करण्याचा अधिकार आणि पौरोहित्य करण्याचा अधिकार धर्माने केवळ ब्राह्मणांनाच दिलेला आहे ही गोष्ट खरी आहे. आता बदलत्या जमान्यात ही संकल्पना बदलत चालली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात ब्राह्मणेतर जातीचे पुजारीही नेमले गेले आहेत. तामिळनाडूत तर अनेक मंदिरांमध्ये ब्राह्मणेतर जातीतले आणि दलित समाजातले पुजारी नेमले गेलेले आहेत. महाराष्ट्रात हे येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

पुरोहितांची आणि पुजार्‍यांची गरज अनेक जातींच्या लोकांना भासत आहे. ब्राह्मण समाजातल्या ज्या लोकांनी पौरोहित्याचा आपला परंपरागत व्यवसाय टिकवून ठेवला आहे. त्यांची कमाई फार उत्तम होत आहे. पूर्वी भिक्षुक किंवा पुरोहित म्हटला म्हणजे तो गरीब असणारच असे ठरलेले होते. कळकट पंचा नेसलेला, दाढी वाढलेला ब्राह्मण म्हणजे पुरोहित अशी प्रतिमा निर्माण झाली होती. परंतु आज मोठ्या शहरात या पुरोहितांची कमाई चांगलीच व्हायला लागली आहे. पुण्यातले काही पुरोहित तर स्वतःच्या कारमध्ये बसून पुजेला जात असतात. स्कूटरवरून जाणारे पुरोहित ही तर आता सामान्य गोष्ट झाली आहे. ब्राह्मण समाजात मध्यंतरीच्या काळात या व्यवसायाकडे कोणी वळत नव्हते. परंपरागत व्यवसाय सोडून शिक्षण घेऊन चांगल्या नोकर्‍या मिळवण्याकडे या समाजाचा ओढा असल्यामुळे पौरोहित्य करणारे ब्राह्मण कमी झाले आहेत. अजूनही समाजाच्या मोठ्या वर्गात पूजा करायला, वास्तुशांतीला, अंत्यविधीला, मर्तिकाच्या पुढच्या उपचारांना, लग्नाला ब्राह्मण पुजारीच असावा असे मानले जाते. परंतु गरजेच्या आणि मागणीच्या मानाने कमी ब्राह्मण उपलब्ध झाले. परिणामी त्यांची टंचाई भासत आहे आणि म्हणूनच त्यांची कमाईही जास्त झाली आहे. इतर समाजातल्या तरुणांना इच्छा असेल तर त्यांनी या व्यवसायाकडे वळले पाहिजे.

हिंदू समाजाची रचना जातीजातीनिहाय झालेली आहे. परंतु पूजेला मात्र ब्राह्मणच हवा असतो. मात्र आता ही टंचाई एवढी जाणवत आहे की ब्राह्मणेतर समाजातल्या मुलांनी आवश्यक ते शिक्षण घेऊन या व्यवसायात पदार्पण केले तर हिंदू समाज त्यांना पुरोहित म्हणून स्वीकारेल. तेवढी जातीची बंधने आता कडक राहिलेली नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्मजागरण समितीने नुकतेच सोलापूरमध्ये ब्राह्मणेतर समाजातील मुलांना पौराहित्याचे धडे देणारे वर्ग घेतले आहेत आणि या समाजातले बरेच तरुण आता पौराहित्य करण्यास सज्ज झाले आहेत. ते हा व्यवसाय करतही आहेत. हा बदल लक्षात घेतला पाहिजे. हा विषय झाला सर्वसाधारण हिंदू समाजाचा. परंतु आज नवबौध्द समाजातसुध्दा पौराहित्य करणार्‍यांची वानवा आहे. तीच परिस्थिती जैन समाजाचीसुध्दा आहे. त्याशिवाय ख्रिश्‍चन धर्माच्या चर्चेसमध्येसुध्दा धर्मप्रचारक, नन्स यांची वानवा आहे. तेव्हा त्या त्या धर्माच्या आणि जातीतल्या मुलांनी बिनभांडवली उद्योग म्हणून या व्यवसायाकडे पाहायचे ठरवले तर त्यांना हा एक चांगला उद्योग म्हणून करता येईल. अशी खात्री वाटते.

थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांनी हिंदू धर्मातले वैदिक संस्कार नाकारले आणि सत्यशोधक समाज स्थापन केला. सत्यशोधक समाजाची शिकवण मानणारे आणि अनेक लोक आहेत. आपल्या मुलामुलींचे विवाह करताना आणि अन्य धार्मिक विधी करताना सत्यशोधकी पध्दतीने करतात. पण याही पध्दतीचे ज्ञान असणारे त्या समाजातले पुरोहित म्हणाव्या त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्याही विधींची माहिती असणार्‍या तरुणांना सत्यशोधकी पध्दतीचा पुरोहित म्हणून व्यवसाय करता येतो. हिंदू समाजातले अनेक लोक आर्य समाजाला मानतात आणि आर्य समाजातले विवाहादी समारंभाचे विधी वेगळे आहेत. तिथे पौरोहित्य करणार्‍यांना जातीची अट नसते. तिथेही ब्राह्मणेतर तरुण पुरोहित म्हणून काम करू शकतात. सध्या समाज कोणताही असो. पण धार्मिक विधींचे महत्त्व सर्वांना पटायला लागले आहे. मात्र त्यांना पुरोहित म्हणावे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत त्यांची ही अडचण विचारात घेऊन स्वतंत्र उद्योगाच्या शोधात असलेल्या तरुणांनी ही नवी वाट चोखाळायला हरकत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज लाखो भारतीय लोक विविध देशात जाऊन राहिलेले आहेत. परंतु त्यांना तिथे निरनिराळे समारंभ आणि धार्मिक विधी करण्यासाठी पुरोहित उपलब्ध होत नाहीत तेव्हा एखाद्या धडपड्या तरुणाने अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर अशा भारतीयांची संख्या मोठी असलेल्या देशात जाऊन तिथे पुरोहित म्हणून काम केले तर त्याला उत्तम प्राप्ती होऊ शकते.

Leave a Comment