नवी दिल्ली – मायक्रोसॉफ्ट आता नोकियाचे अधिकृतरीत्या नामकरण करून मायक्रोसॉफ्ट ल्युमिया असे करणार आहे. रिब्रँडिंगची ही प्रक्रिया फ्रान्समधून सुरू होईल. फ्रेंच फेसबुकवरून मायक्रोसॉफ्टने ही माहिती जाहीर केली आहे. या अंतर्गत फेसबुक, ट्विटर व अन्य सोशल मीडिया अकाउंट्सवर नोकिया नावाला ‘मायक्रोसॉफ्ट ल्युमिया’ असे बदलण्यात येणार आहे. ब्रँडनेम बदलण्याची ही प्रक्रिया जगात एकाच वेळी करण्याऐवजी विविध देशांत एकानंतर एक अशा पद्धतीने करण्याची कंपनीची योजना आहे. भारतात या वर्षाच्या अखेरीस ही प्रक्रिया सुरू करण्याचे कंपनीचे प्रयत्न आहेत.
मायक्रोसॉफ्ट करणार नोकियाचे नामकरण
मायक्रोसॉफ्टने यावर्षी एप्रिलमध्ये नोकियाची हँडसेट डिव्हिजन सुमारे ४३२ अब्ज रुपयांमध्ये खरेदी केली होती; परंतु एवढ्या महिन्यांनंतरही बाजारात फिनिश नोकिया ब्रँड पाहायला मिळत होता.
मायक्रोसॉफ्टने अलीकडेच ‘ल्युमिया ७३०’, ‘ल्युमिया ८३०’ मोबाइल फोन नोकिया ब्रँडनेमने बाजारात उतरवले होते; परंतु दोन्ही फोन कंपनीच्या जुन्या ब्रँडनेमचे शेवटचे फोन असतील, असे सूत्रांनी सांगितले.