संथगतीने सुरु आहे पनवेल- सायन महामार्गाचे काम

highway
मुंबई – पनवेल-सायन महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण असतानाही टोल वसुलीची तयारी करण्यात आली आहे. जोपर्यंत सर्व कामे पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल नाका सुरु करु नये अशी मागणी होत आहे. कामोठे व कळंबोली हद्दीत कामे अतिशय संथ गतीने सुरु असल्याने प्रवासी आणि स्थानिकांना त्याचा त्रास होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून अधिकार्‍यांची ठेकेदारधार्जिणी भूमिका दिसून येत आहे.

कामोठे वसाहतीलगतचे सर्व्हिस रोडचे काम गेल्या काही महिन्यापासून सुरु आहे. ते आजपर्यंत पूर्ण करण्यास ठेकेदाराला यश आले नाही. त्यामुळे कामोठेकरांना मुंबई बाजूकडे जाण्यासाठी उड्डाणपुलाच्या प्रवेशावर जावे लागत आहे. त्याचबरोबर बस थांबाही पुलाच्या तोंडाजवळ करण्यात आला असून पाठीमागून भरघाव वेगाने येणार्‍या वाहनांमुळे प्रवाशांना जीव मुठीत धरुन उभे राहावे लागत आहे. येथे निवारा शेड नसल्याने ऊन, वारा, पावसापासून प्रवाशांचे संरक्षण होत नाही. त्यांना अनेक गैरसोयीला सामोरे जावे लागते. पुलाजवळ दररोज लहान मोठे अपघात घडत असून हा स्पॉट डेंजर झाला आहे. सर्व्हिस रोडचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ही अशीच स्थिती राहणार असून त्याचा त्रास स्थानिक प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. त्याचबरोबर उड्डाण पुलालगतचे रोड पावसाने उखडले असून खड्डे आणि धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष केले जात आहे.