कॅनडाच्या संसदेवर अंदाधुंद गोळीबार; एक जवान शहीद

attack
ओटावा – कॅनडा संसदेसमोरील नॅशनल वॉर मेमोरियलवर बुधवारी सकाळी एका हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये एका सैनिकाचा मृत्यू झाला. हल्लेखोर गोळीबार करत संसद भवनाच्या दिशेने धावत होता. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार साधारण २० गोळ्या झाडण्यात आल्या.

कॅनडा संसदेजवळच्या नॅशनल वॉर मेमोरियलवर एका हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार करत संसद भवनात प्रवेश केला. यावेळी जवानांना हल्लेखोराला ठार मारण्यात य़श आले असले तरी संसद भवनात झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला.

ओटावा पोलिसांनी हल्ल्याची माहिती टि्वटरवर दिली आहे. संसदेच्या आतही गोळ्या झाडण्यात आल्याचे समजते. पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्यासह सर्व खासदारही सुरक्षित आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव काही सरकारी इमारती बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच आणखी एक हल्लेखोर असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून कसून तपास केला जात आहे. हा दहशतवादी हल्ला असावा, अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

संशयित हल्लेखोराची ओळख पटली आहे. मायकल झेहाफ बिबाऊ (३२) असे त्याचे नाव असल्याचे समजते. झेहाफ बिबाऊ याला २००३ मध्ये चोरी आणि अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोन वर्षाची शिक्षा झाली होती. तसेच त्याच्या विरोधात ड्रग्ज प्रकरणी चौकशी सुरु होती, असे कॅनडातील सीटीव्ही या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

Leave a Comment