मनसे सरचिटणीसपदाचा दरेकरांनी दिला राजीनामा

pravin-darekar
मुंबई : विधानसभेतील मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धोरण चुकले नाही तर आमदार कमी पडले, अशी प्रतिक्रिया दिल्याने नाराज झालेल्या प्रविण दरेकर यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत पक्षाचे धोरण चुकल्याचे मत बहुसंख्य नेत्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत व्यक्त केले होते.

राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमिमांसा करण्याकरिता मनसेच्या नेत्यांची बैठक निवासस्थानी बोलावली होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीत पक्षाचे धोरण चुकले, असे मत बहुसंख्य नेत्यांनी व्यक्त केले. कधी मोदींना पाठिंबा द्यायचा तर कधी विरोध करायचा यामुळे मनसे अडचणीत आली, असे मत काहींनी व्यक्त केले. मराठी भाषकांची मते भाजपाला कशी गेली, असा सवाल राज यांनी केल्याचे समजते. बैठकीत पक्षाचे धोरण चुकल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर यांनी पक्षाचे धोरण नव्हे तर आमदार कमी पडले, अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे नाराज झालेल्या प्रविण दरेकर यांनी राजीनाम्याची घोषणा केली.

Leave a Comment