आठवलेंनी केली दोन मंत्रिपदांची मागणी

ramdas-athavale
मुंबई – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाचा एकही आमदार निवडून आला नसतानाही त्यांनी भाजपकडे दोन मंत्रिपदांची मागणी केली असून त्यात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपदाचा समावेश आहे. एवढेच नाही तर सहा महामंडळेही द्यावीत, असेही ते म्हणाले आहे. याबाबत लेखी करार भाजपबरोबर झाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात १० टक्के सत्तेचा वाटा देण्याचे मान्य करण्यात आले आहे. मात्र आमदार निवडूनच आले नसल्याने तेवढा वाटा मिळणार नाही म्हणूनच दोन मंत्रीपदे मागितली असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्राला नवीन सरकार लवकरच मिळाले पाहिजे. भाजपने लवकर मुख्यमंत्रीपदाबाबतचा वादही सोडवावा. कोणीही मुख्यमंत्री झाले तरी रिपाइंचे त्यांना समर्थन असेल असेही ते या वेळी म्हणाले. मात्र रिपाइंला सत्तेचा वाटा मिळालाच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली. निवडणूकपूर्व लेखी करारानुसार सत्तेत १० टक्के वाटा मिळाला पाहिजे, असे असले तरी एकही आमदार निवडून आला नसल्याने तेवढा वाटा देणे आणि मागणेही योग्य नाही, असे आठवले म्हणाले. म्हणूनच दोन मंत्रिपदांची मागणी भाजपकडे केली असल्याचे ते म्हणाले. शिवाय या दोन्ही मंत्र्यांना भाजपने विधान परिषदेवर घ्यावे, असेही ते म्हणाले.

Leave a Comment