शाळा उडवून देण्याचा कट रचणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक

mumabi
मुंबई – मुंबईच्या उच्चभ्रू वस्ती बांद्रा -कुर्ला कॉम्प्लेक्समधील एका अमेरिकन शाळेत बॉम्बस्फोट घडविण्याचा विचार करीत असलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला मुंबईत अटक करण्यात आली असून याने फेसबुकवरील चॅटिंगमध्ये आपण बीकेसीमधील अमेरिकन शाळेत बॉम्बस्फोट घडविणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्याच्याविरोधात हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या संशयास्पद चॅटिंग व दहशतवादी संघटनांच्या संबंधाबाबत एटीएस तपास करीत आहेत.

कुर्ला पश्‍चिम येथे राहणारा २४ वर्षीय अनिस अन्सारी हा बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो. आलिशान गाड्‌यामध्ये बसविल्या जाणार्‍या जीपीएस प्रणालीचे डिझाईन तयार करण्याचे काम तो करतो. इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या रियाझ भटकळ कुर्ल्यातील ज्या परिसरात राहायचा तेथे तो राहतो.

दहशतवादविरोधी पथकाची मागील काही दिवसापासून अन्सारीच्या हालचालीवर नजर होती. अन्सारीने एक बनावट फेसबुक अकाऊंट सुरू केले होते. त्याद्वारे तो इराक आणि सिरियामधील ‘आयएसआयएस’ या दहशतवादी संघटनेच्या कारवायांवर लक्ष ठेऊन होता. या संघटनेची प्रक्षोभक व्हिडीओ पाहून त्यांच्या विचारसरणीकडे तो आकर्षित झाला. त्यातूनच अमेरिकी व पाश्‍चात देशांच्या फौजाकडून होणार्‍या हल्ल्यांच्या बातम्या वाचू लागला. त्यामुळे त्याला अमेरिकी फौजांबाबत चीड निर्माण झाली. अमेरिक न नागरिकांचा सुड घेण्याच्या विचारातूनच त्याने बीकेसीतील अमेरिकन काउंस्युलेटमध्ये काम करणार्‍या अमेरिकी नागरिकांची मुले शिकत असलेल्या शाळेत बॉम्बस्फोट घडविण्याबाबत चॅटिंग केले. याबाबतची माहिती मिळताच एटीएसने आयपी ऍड्रेच्या मदतीने त्याला अटक केली. त्याच्या घरातील व कार्यालयातील संगणकाची हार्ड डिस्क, मोबाइल पोलिसांनी जप्त केला असून तो चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवला आहे.

Leave a Comment