हाडे ठिसूळ होण्याचा महिलांना अधिक धोका

bone
वय वाढले की, हाडे ठिसूळ होतात आणि छोट्याशाही अपघाताने फ्रॅक्चर होऊ शकते. जगात दरवर्षी हाडे ठिसूळ झाल्यामुळे फ्रॅक्चर होण्याची २० लाख प्रकरणे घडतात. अशा प्रकारच्या फ्रॅक्चरचा धोका पुरुषांपेक्षा महिलांना जास्त असतो. विशेषत: ५० वर्षे ओलांडली की, हा धोका वाढायला लागतो. महिलांमध्ये हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण खालील कारणांमुळे जास्त असते.

१) रज्जोनिवृत्ती – विशिष्ट वयामध्ये महिलांना या प्रक्रियेला तोंड द्यावेच लागते आणि एकदा रज्जोनिवृत्ती सुरू झाली की, महिलांच्या आरोग्याचा सर्वात मोठा आधार समजले जाणारे एस्ट्रोजीन हे हार्मोन कमी व्हायला लागते. एस्ट्रोजीन हे हाडांना सुद्धा बळकटी देत असते. पण ते कमी व्हायला लागले की, हाडे ठिसूळ व्हायला लागतात. कॅल्शियम आणि व्हिटॅमीन बी युक्त अन्नाचे सेवन आणि वजन कमी करणारा व्यायाम केला तर मात्र रज्जोनिवृत्तीमुळे हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण कमी होते.

२) हाडांची रचना – महिलांच्या शरीराची रचना विशिष्ट प्रकारची असल्यामुळे त्यांच्या शरीरात पुरुषांपेक्षा ३० टक्के हाडे कमी असतात. त्यामुळे सुद्धा त्यांची हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचबरोबर वयामुळे सुद्धा हाडे ठिसूळ होतात. २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान हाडांचे प्रमाणही जास्त असते मात्र पन्नाशी गाठली की हाडे कमी व्हायला लागतात आणि उरलेल्या हाडांवर शरीराचा भार पडल्यामुळे त्यांच्यात अशक्तपणा येण्याची शक्यता असते.