युती करायची असेल तर बिनशर्त करा – भाजप

yuti
मुंबई – अफझलखानाची फौज, उंदीर अशी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात परस्परांना नावे ठेवणा-या शिवसेना आणि भाजपमध्ये मनोमिलन होण्याचे संकेत मिळत असून सत्तेचा जादूई १४५ आकडा गाठण्यासाठी भाजप शिवसेनेची मदत घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील जनतेने कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न दिल्यामुळे महाराष्ट्रात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.

भाजपला आणखी २२ आमदारांच्या पाठिंब्याची सत्ता स्थापनेसाठी आवश्यकता असून भाजपला राष्ट्रवादीने बाहेरुन पाठिंबा देऊ केला आहे. मात्र राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यास चूकीचे संदेश जाण्याची भिती असल्याने भाजप आधी शिवसेनेला प्राधान्य देण्याची शक्यता आहे.

मात्र सत्ता स्थापनेत शिवसेनेला एका मर्यादे पलीकडे महत्व न देण्याची भाजपची रणनिती आहे. शिवसेनेने भाजपच्या मुख्यमंत्री निवडीमध्ये कोणताही हस्तक्षेप करु नये यासाठी भाजपने आधी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवून नंतर शिवसेनेबरोबर चर्चा करण्याची रणनिती आखली आहे.

उद्या युती झाल्यास, आपलाच शब्द त्यात अंतिम राहील याची काळजी भाजप नेते आतापासूनच घेत आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र युती तुटण्याला जबाबदार असणा-या नेत्यांपैकी फडणवीस एक आहेत असे शिवसेना मानते तसेच त्यांच्या स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेलाही शिवसेनेचा विरोध आहे.

Leave a Comment