
मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केल्यानंतर त्यावर उत्तर देण्याचे टाळले आहे. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल असे त्यांनी म्हटले असून त्याचबरोबर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल पत्रकार परिषदेत जनतेचे आभार मानले.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल शहांनी मानले जनतेचे आभार
केंद्रातील मोदी सरकारवर विश्वास व्यक्त करत महाराष्ट्र आणि हरियाणाच्या जनतेने पक्षावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभारी आहोत. दोन्ही राज्यांमध्ये भाजपच्याच नेतृत्वात सरकार स्थापन होईल आणि भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असे त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यात कोणताच पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करणार नाही असे दिसत असल्यामुळे सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला राज्यात स्थिर सरकार येण्यासाठी बाहेरुन पाठिंबा देण्याचे काही वेळापूर्वीच घोषित केले होते. त्यावर स्पष्ट उत्तर देण्याचे शहा यांनी टाळले आहे. त्याचबरोबर राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होईल असे ठामपणे त्यांनी सांगितले.
