सरकार स्थापनेसाठी भाजप तयारीत- मुख्यमंत्री विदर्भातला

devendra
मुंबई – महाराष्ट्रातील विविध संस्थांची सर्वेक्षणे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांनी स्वतंत्रपणे करून घेतलेली चार सर्व्हेक्षणे आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, नितीन गडकरी यांनीही त्यांच्यातर्फे करून घेतलेल्या मतदानोत्तर चाचण्या या सर्वांतूनच भाजप सरकार स्थापनेची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापनेची तयारी सुरू केली असून त्यासंदर्भातली महत्वाची बैठक मुंबईत रविवारी होत आहे. भाजपचे निवडणूक प्रभारी ओम माथूर,अमित शाह व अन्य नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही बैठक शुक्रवारी घेण्यात येणार होती मात्र नंतर निवडणूक निकाल हाती आल्यावर रविवारी सायंकाळी घेण्याचे ठरले असे समजते.

चाणक्य सर्वेक्षणात भाजपला बहुमत दाखविले गेले आहे तर अन्य सर्वेक्षणातून भाजप सर्वात मोठा पक्ष असेल असे वर्तविले गेले आहे. मात्र अमित शहा यांनी करून घेतलेल्या सर्वेक्षणात भाजपला १६५ जागा मिळतील असा अंदाज दिला गेला आहे. त्यामुळे भाजप सरकार स्थापनेच्या तयारीला लागले असून मुख्यमंत्रीपदासाठी नागपूरचे देवेंद्र फडणवीस आणि चंद्ररपूरचे सुधीर मुनगंटीवार यांच्यात जोरदार रस्सीखेच आहे. आजच्या बैठकीत त्यासंदर्भातला निर्णय अपेक्षित आहे तसेच भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर पुढची रणनितीही याच बैठकीत ठरविली जाणार असल्याचे समजते.

भाजप सत्तेवर आले तर आगामी मुख्यमंत्री विदर्भातला असेल हे नक्की मानले जात आहे. फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर मुनगंटीवार यांनीही हे पद भूषविले आहे. मुनगंटीवार यांचा अनुभव जास्त आहे व ते वरीष्ठ नेते आहेत. तसेच मुख्यमंत्री ठरविताना अन्य आमदारांची मते लक्षात घेतली गेली तर ओबीसी असण्याचा फायदा मुनगंटीवार यांना अधिक मिळेल असेही सांगितले जात आहे. शिवाय ते गडकरींचे निकटवर्ती आहेत. मात्र पंतप्रधान मोदींनी नागपूर सभेत फडणवीस यांची केलेली स्तुती फडणवीसांचे पारडे जड करून गेली आहे.

या स्पर्धेत विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते विनोद तावडे तसेच पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार केला जात असल्याचेही सांगितले जात असले तरी मुख्य चुरस मुनगंटीवार आणि फडणवीस यांच्यातच असल्याचे मानले जात आहे. खडसे या पदाचे दावेदार असले तरी त्यांची प्रकृती लक्षात घेता त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली जाणार नाही असे सांगितले जात आहे.

Leave a Comment