तांत्रिक बिघाडामुळे रद्द झालेल्या विमानातील प्रवाशांचे दुस-या दिवशीही हाल

air-india
पुणे – इंजिन खराब झाल्यामुळे गुरुवारी रात्री रद्द करण्यात आलेले एअर इंडियाचे विमान काल (शुक्रवारी) देखील उड्डाण घेऊ शकले नाही. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. संतप्त झालेल्या प्रवाशांनी काल सायंकाळी लोहगाव विमानतळावर गोंधळ करत तत्काळ जाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. याविषयी अधिकारीक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे फ्लाईट क्रमांक एआय ८४५ गुरुवारी रात्री दिल्लीकडे रवाना होणार होते. मात्र उड्डाणाच्या वेळी इंजिनमधून आवाज आल्याने वैमानिकाने उड्डाण रद्द केले. तांत्रिक कारणामुळे विमान रद्द करत असल्याचे सांगत शुक्रवारी सकाळी दुस-या विमानाने दिल्लीला नेण्यात येईल असे प्रशासनाने सांगितले. मात्र काल रात्री उशिरापर्यंत या प्रवाशांना दुसरे विमान उपलब्ध करून देण्यात एअर इंडिया अपयशी ठरल्याने संतप्त प्रवाशांनी गोंधळ घातला. या संदर्भात एअर इंडियाच्या अधिका-यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या कार्यालयातील फोन उचलण्यात येत नव्हता.