सत्तेवर आल्यावर नव्या सरकारमध्ये नवे महाधिवक्ता!

khambata
मुंबई – अनेक वर्ष महाराष्ट्रासाठी महाधिवक्ता म्हणून कार्यरत असलेले ज्येष्ठ वकील दरायस खंबाटा यांनी नुकताच राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नव्याने सत्तेत येणाऱ्या सरकारला तातडीने नव्या अँडव्होकेट जनरलची नेमणूक करावी लागणार आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुमारे अडीज वर्षांपूर्वी खंबाटा यांची यापदावर निवड केली होती. परंतु महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी तुटल्याने चव्हाण यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार, २८ सप्टेंबरपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यादरम्यानच खंबाटा यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला होता. परंतु, नवे सरकार स्थापन होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळा, अशी सूचना राज्यपालांनी केली होती. त्याप्रमाणे त्यांनी मागच्या दोन आठवड्यांत मुंबई उच्च न्यायालयातील आपली जबाबदारी सांभाळली. आता मात्र पदमुक्त होण्याची त्यांची इच्छा आहे.मी काही दिवसांपूर्वीच पदाचा राजीनामा दिला आहे. परंतु, राज्यपालांनी तो त्वरित न स्वीकारता काही दिवस सेवेत राहण्याची सूचना केल्याने मी काम सुरू ठेवले. मात्र, दिवाळीच्या सुटीनंतर उच्च न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरू होईल तेव्हा मी या पदावर नसेन. कारण यापुढे मी खासगी वकिली करण्याचे ठरवले आहे’, असे खंबाटा यांनी म्हटले आहे. या पदावर काम करण्याची संधी मिळाली तरी मी करणार नाही, असेही ते म्हणाले.

Leave a Comment