बाबा आमटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ निघणार `टपाल तिकीट’

baba-amte
चंद्रपूर – थोर समाजसेवक स्व. बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या डाक विभागाने घेतला आहे. यासाठी भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. नुकतेच डाक विभागाच्या संचालक राशी शर्मा यांनी मुनगंटीवार यांना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली आहे.

मुनगंटीवार यांनी ८ ऑगस्ट रोजी केंद्रीय संचारमंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेऊन स्व. बाबा आमटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकीट प्रकाशित करण्याच्या मागणीसंदर्भात चर्चा केली. या वेळी राज्य विधानसभेतील आमदारांच्या स्वाक्षरीचे निवेदन त्यांना देण्यात आले. या चर्चेदरम्यान रविशंकर प्रसाद यांनी २०१४ मध्ये स्व. बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त टपाल तिकीट प्रकाशित करून त्यांना आदरांजली वाहण्यात येईल, असे आश्वासन मुनगंटीवार यांना दिले होते. या आश्वासनानुसार केंद्र शासनाच्या डाक विभागाने टपाल तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुनगंटीवार यांनी २००९ पासून केंद्र सरकारशी या मागणीबाबत पत्रव्यवहार करीत पाठपुरावा केला आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत शिफारस करावी यासंदर्भातही मुनगंटीवार यांनी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला. १६ मार्च २००९ ला तत्कालीन केंद्रीय संचारमंत्री ए. राजा यांना राज्य विधानसभेतील ६३ आमदारांच्या स्वाक्षरीचे निवेदन सादर करण्यात आले होते. त्यानंतर राज्यातील तत्कालीन सर्व खासदार, केंद्रीय मंत्री यांच्याशीसुद्धा पत्रव्यवहार केला. या पाठपुराव्याला यश येऊन स्व. बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त टपाल तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. शांतिदूताच्या रूपात उपेक्षित, वंचितांची सेवा करण्यासाठी आपले जीवन खर्ची घालणा-या बाबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त टपाल तिकीट प्रकाशित करण्याच्या प्रक्रियेत योगदान देऊ शकल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Comment