कुर्ला कारशेडमध्ये १५ डब्ब्यांच्या लोकल गाड्यांच्या देखभालीत अडचण

carshed
मुंबई – वाढत्या लोकसंख्येमुळे रेल्वे गाड्याचे डब्बे नऊवरून पंधरा करण्यात आले. त्यामुळे गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या लांबच-लांब रेल्वे गाड्यांच्या देखभालीसाठी खूप कष्ट घ्यावे लागत आहे. मध्य रेल्वेवरील लोकल प्रामुख्याने १२ डब्यांच्या असून केवळ एक लोकल पंधरा डब्यांची आहे. या गाडीच्या अतिरिक्त लांबीमुळे ही गाडी कारशेडमध्ये दुरूस्तीच्या ठिकाणी उभे करणे कठीण जाते. त्यासाठी तीन डबे वेगळे करून देखभालीचे काम करावे लागते. काम झाल्यावर पुन्हा ते डब्बे जोडून लोकल सेवेत नेण्यात येते, असाच प्रकार कुर्ला कारशेडमध्ये पाहायला मिळाला आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कारशेडमधील ६२ वृक्षांचे अन्यत्र रोपण करून १५ डब्याच्या लोकलसाठी जागा उपलब्ध करण्याची योजना आखली आहे.

तसेच या ठिकाणी असणारे वृक्ष काढून ते रेल्वेच्या अन्य परिसरात रुजवले जातील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली. त्यासाठी पालिका आणि वृक्ष प्राधिकरण स​मितीकडे परवानगी मागण्यात आली आहे. ही मागणी मान्य झाल्यास तातडीने त्या कामास सुरूवात केली जाईल. साधारणपणे एका महिन्यात अन्यत्र रोपण करून १५ डब्यांच्या लोकल दुरुस्तीतील अडचण दूर केली जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यात वृक्षांना कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. तज्ज्ञांच्या सहाय्याने या वृक्षांचे रोपण केले जाणार आहे.

Leave a Comment