
गुवाहाटी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी खेळाडू माझे मित्र आहेत, असे म्हटले होते. मात्र, आसाममध्ये राष्ट्रीय भाला फेक स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या देवयानी हिला मात्र चेटकीण असल्याचे सांगत मारहाण करण्यात आली होती आणि यातना देण्यात आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणा-या देवयानी करबी आंग लांग जिल्ह्यातील चेरे काली गावातील गरीब शेतमजूर आहे. तीन मुले आणि पती यांच्यासोबत मोलमजूरी करत असताना गावात तीन मद्यपींचा मृत्यू झाला आणि एका तरूणाने प्रेम असफल झाल्याने आत्महत्या केली. या सर्वांचा आरोप देवयानीवर लावण्यात आला. गाववाल्यांच्या मृत्यूला ती जबाबदार आहे आणि जादूटोणा करते म्हणून ते मृत्यू पावले आहेत, असा आरोप ठेवून पंचायतीने तिची सुनावणी केली. त्यानंतर मासेमारीच्या जाळ्यात बांधून तिला मारहाण करण्यात आली. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. गावातील मृत्यूला कोणीतरी चेटकीण कारणीभूत आहे, हे समजून गावक-यांनी हे कृत्य केले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक मुग्धा जोतीमहंत यांनी सांगितले की, मारहाण करणा-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामागील खरी कारणे व्यक्तीगत स्वरूपाची असू शकतात, असे त्या म्हणाल्या. या मारहाणीमुळे देवयानीला डिसेंबर अखेर मलेशियात होणा-या आशियार्इ मास्टर्स विजेतेपदाच्या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. तिने सांगितले की, २०११-१२ मध्ये देखील पैसे नसल्याने तिला स्पर्धेत भाग घेता अला नव्हता. यावेळी ती ही संधी दवडू इच्छित नाही. आसाममध्ये मागील पाच वर्षात ९० महिलांना चेटूक करतात म्हणून जिवंत जाळणे, मुंडके उडवणे अशा पद्धतीने ठार करण्यात आले आहे.
