महाराष्ट्रात दारू आणि पैसे वाटपाने तोडले विक्रम

voters
मुंबई – यंदा युती-आघाडी तुटल्यामुळे महाराष्ट्रात अभूतपूर्व विधानसभा निवडणूका झाल्या. प्रत्येक पक्ष स्वबळावर लढत असल्याने जिंकण्यासाठी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वपक्षीयांमध्ये स्पर्धा लागली होती. मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारू आणि पैसे वाटप केले जातात हे आतापर्यंत अनेकदा ऐकले आहे. पण यंदा महाराष्ट्रात जप्त झालेली रक्कम ही आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढणारी ठरली आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी दिली आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या १५ दिवसांत राज्यातील कानाकोप-यातून १७.९२ कोटींची रोख रक्कम, तर ४ लाख ६१ हजार लिटर इतकी दारूही जप्त करण्यात आली आहे. याची किंमत सुमारे १० कोटी १९ लाख इतकी आहे. या जप्त करण्यात आलेली रोख रक्कम आणि दारूची मिळून सुमारे २८ कोटींच्या घरात आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणूकीत राज्यात अभूतपूर्व पैशांचा पाऊस आणि दारूचा महापूर पाहायला मिळाला.