एकिझट पोल सांगतात- मोदींचा करिश्मा अजूनही कायम

kamal
मुंबई – महाराष्ट्र आणि हरियानात विधानसभांसाठी अनुक्रमे ६४ व ७३ टक्के मतदान झाले असताना विविध संस्थांतर्फे करण्यात आलेल्या निवडणूकोत्तर चाचण्यांचे अहवाल मोदींची जादू अजूनही कायम असल्याचे सांगत आहेत. या दोन्ही राज्यात पंतप्रधान मोदींनी १३ दिवसांत ३३ प्रचारसभा घेतल्या होत्या आणि मोदींचा करिश्मा येथे भाजपला सत्ता मिळवून देईल असे हे निकाल सांगत आहेत.

टुडेज चाणक्य, टाईम्स नाऊ, सी व्होटर, एबीपी- नेल्सन यांची ही सर्वेक्षणे आहेत. त्यानुसार भाजप दोन्ही राज्यात सर्वाधिक मोठा पक्ष ठरणार आहे. टुडेज चाणक्यच्या मते दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार सत्तेवर येऊ शकते. हे खरे ठरले तर या दोन्ही राज्यात प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री बनू शकणार आहे. यंदा मतदानाचा टक्का वाढल्यानेही भाजपला आपल्याला अधिक फायदा मिळेल असा विश्वास वाटतो आहे. आजपर्यंत हरियाना आणि महाराष्ट्रात भाजप ज्युनिअर पार्टनर म्हणूनच कार्यरत होता आता दोन्ही ठिकाणी असलेल्या युत्या तोडून स्वबळावर लढल्याचा फायदा भाजपला नक्कीच मिळताना दिसत आहे असे तज्ञांचे मत आहे.

या दोन्ही राज्यात काँग्रेस सत्तेवर होती. आताच्या निवडणुकात काँग्रेसला तिसरे अथवा चौथे स्थान मिळेल असे या सर्वेक्षणांचे निष्कर्ष आहेत. काँग्रेस या दोन्ही राज्यात विरोधी पक्ष म्हणूनही स्थान मिळवू शकणार नाही असाही अंदाज वर्तविला जात आहे. म्हणजेच जे लोकसभा निवडणुकांत झाले तेच या दोन्ही राज्यात काँग्रेसच्या बाबतीत घडेल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment