आयआरएनएसएस १ सी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

isro
श्रीहरिकोटा – ‘भारतीय क्षेत्रीय नौवहन उपग्रह प्रणाली’मधील (आयएसएनएसएस) `आयआरएनएसएस १ सी’ या तिसऱ्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. मध्यरात्री १ वाजून ३२ मिनिटांनी या उपग्रहाने उड्डाण केले. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी श्रीहरिकोटास्थित सतीश धवन अंतराळ केंद्रातून `आयआरएनएसएस १ सी’ उपग्रहाचे ‘पीएसएलव्ही सी २६`च्या सहाय्याने ठराविक कक्षेत यशस्वीरित्या स्थापित करण्यात आले आहे. या उपग्रहाचे वजन १,४२५ किलोग्रॅम आहे.

इस्त्रोचे अध्यक्ष राधाकृष्णन यांनी सांगितले की, भारताने यशस्वीरित्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. इस्त्रोमधील शास्त्रज्ञांचा समूह यासाठी अभिनंदनास पात्र आहे. याबरोबरच त्यांनी उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित होण्यासाठी योगदान देणा-या सर्व सहका-यांचे अभिनंदन केले. १४२५ किलोग्रॅम वजनाच्या या उपग्रहाचा कालावधी १० वर्षांचा आहे. पूर्णत: विकसित आयआरएनएसएस प्रणालीमध्ये पृथ्वीपासून ३६ हजार किमी उंचीवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमच्या ठराविक कक्षेत तीन उपग्रह असतील तसेच अन्य चार उपग्रह भूस्थिती कक्षेत असणार आहेत. सात उपग्रहांचा समावेश असलेल्या आयएसएनएसएस प्रणालीमध्ये १,४२० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे आणि वर्ष २०१५ पर्यंत हा उपक्रम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. याआधी आयआरएनएसएस १ सी’ उपग्रह १० ऑक्टोबर रोजी १ वाजून ५६ मिनिटांनी भारतीय रॉकेट `पीएसएलव्ही सी २६’ च्या २८ व्या उड्डाणामध्ये प्रक्षेपित केले जाणार होते. परंतू तांत्रिक कारणांमुळे प्रक्षेपणाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.`आयएसएनएसएस`मधील पहिले दोन उपग्रह `आयआरएनएसएस १ ए’ आणि `आरएनएसएस १ बी’चे प्रक्षेपण अनुक्रमे १ जुलै २०१३ आणि ४ एप्रिल २०१४ रोजी श्रीहरिकोटाहून करण्यात आले होते.

Leave a Comment