रिचर्ड फ्लांगान यांचा प्रतिष्ठित ‘बुकर’ने सन्मान

booker
लंडन – भारतात जन्मलेले ब्रिटीश लेखक नील मुखर्जी यांना यंदाच्या वर्षीच्या बुकर पुरस्काराने हुलकावणी दिली आहे. ऑस्ट्रेलियाचे कादंबरीकार रिचर्ड फ्लांगान यांना यंदाचा बुकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. फ्लांगान यांना ‘द नॅरो रोड टू द डीप नॉर्थ’ या बर्मा रेल्वेमधील युद्धकैद्यांच्या कथेवर आधारित कादंबरीसाठी बुकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. टास्मानिया येथे जन्मलेल्या फ्लांगान यांची ही सहावी कादंबरी असून या कादंबरीतील कथा दुसर्‍या महायुद्धात थायलॅंड-बर्मा डेथ रेल्वेच्या निर्माण कार्यादरम्यानच्या कालखंडातील घटनाक्रमांवर आधारित आहे. या रेल्वेमार्गाचे बांधकाम १९४३ साली युद्धकैदी आणि बंदिवान मजुरांनी केले होते. या रेल्वेच्या शोकांतिकामधून बचाविलेल्या काही ठराविक लोकांमध्ये फ्लांगन यांच्या वडिलांचा समावेश होता. विशेष म्हणजे, ज्या दिवशी फ्लांगन यांनी सदर कादंबरीची शेवटची ओळ लिहून पूर्ण केली त्याच दिवशी त्यांच्या ९८ वर्षीय वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना फ्लांगन यांनी सांगितले की, बुकर पुरस्कार जिंकेल अशी मला आशा नव्हती. बुकर पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष एसी ग्रेलिंग यांनी फ्लांगन यांची कादंबरी म्हणजे एक अविश्वसनीय प्रेमकथा आणि त्याचबरोबरीने मानवी दुःखे आणि साहस यांची अद्भुत कथा असल्याचे सांगितले. निवडसमितीच्या परिक्षकांनी या पुस्तकाबाबत बोलताना सांगितले, या पुस्तकातील कथा या युद्धात अडकलेल्या सर्व लोकांबद्दल माहिती देते. तसेच या युद्धाची त्यांना किती मोठ्या प्रमाणात किंमत मोजावी लागली हे देखील सांगते. एखादा मनुष्य राक्षसीपणाच्या सर्व सीमा ओलांडून का पुढे जातो असा प्रश्न या पुस्तकातून विचारण्यात आला आहे. याशिवाय हे पुस्तक त्या सार्‍या शक्यतांचा शोध घेण्याचा प्रयत्न करते ज्या कोणाही व्यक्तीला अत्याचारांच्या सर्व सीमा ओलांडून अत्याचार करण्यास प्रवृत्त करतात. तसेच या पुस्तकात सांगण्यात आले आहे की, अत्याचाराचे बळी फक्त पीडित नागरिकच नसतात तर त्या अत्याचाराला पूर्णत्वास नेणारे देखील पडत असतात, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment