मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नव्हतोच – गडकरी

nitin-gadkari
नागपूर – नागपूर शहराचे खासदार आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपणाला मुख्यमंत्री पदाची अभिलाषा नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपण राष्ट्रीय राजकारणात खूश आहोत आणि पंतप्रधानांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडू असे ते म्हणाले. दोन आठवड्यांच्या निवडणूक प्रचारातील धामधुमीनंतर नागपूरच्या महाल येथील निवासस्थानी विश्रांती घेणा-या गडकरी यांनी राज्यभरात १०८ प्रचारसभा घेतल्या. १५ तारखेच्या मतदानात विदर्भात परिवर्तन दिसेल आणि राज्यात ४० ते ५० जागा विदर्भातून जिंकून भाजप १५० ते १६० जागांवर विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गडकरी यांनी विदर्भात ६४ जाहिर सभांमध्ये प्रचाराचा धडाका लावला होता. ते म्हणाले की, विदर्भातील जनता कॉंग्रेस राष्ट्रवादीला कंटाळली आहे. गेल्या तीन वर्षांपासून तर विकासाचे कोणतेही प्रकल्प मार्गी लागलेले नाहीत. उलट मोदी सरकारने पहिल्या १०० दिवसांत उत्कृष्ट नियोजन आणि अंमलबजावणी यांचा प्रयत्न आणि कृती असा मेळ घालून दाखवला आहे. नागपूरमधील मिहान प्रकल्प कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या उदासीनतेमुळे १५ वर्षे रखडला आहे. तो मार्गी लागला असता तर मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असत्या. आमचे सरकार सत्तेत आल्यावर आम्ही तो तातडीने मार्गी लावू. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर बोलतांना ते म्हणाले की, तेलंगणाच्या धरतीवर वेगळे राज्य करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या मतांचा विचार करून भाजप सरकार निर्णय घेईल. यावर आम्हाला सर्व सहमतीचे निर्णय घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment