बुश यांच्यावरील बूट हल्ला पेटींगला विक्रमी किंमत

bush
दोहा – अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्यावर २००८ साली इराकी पत्रकाराने बूट फेकून हल्ला केल्याच्या घटनेवर तयार करण्यात आलेले वादग्रस्त पेंटींग दोहा येथे सोथबे तर्फे भरविण्यात आलेल्या लिलावात विक्रमी किमतीला विकले गेले आहे. या पेंटींगला ६२५०० डॉलर्स इतकी किंमत मिळाली असून हे पेंटींग इराणी चित्रकार महमूद औबेदी याने तयार केले होते.राजकीय संदर्भांमुळे हे पेंटींग वादग्रस्त ठरले होते.

सोथबे तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार – फेअरवेल किस – या नावाने हे पेटींग चित्रकाराने तयार केले होते. त्याच्या चित्रांना आजपर्यंत मिळालेल्या किमतीत बुश यांच्या पेंटिगला मिळालेली किंमत सर्वाधिक आहेच पण या प्रदर्शनात जी चित्रे विकली गेली त्यातही या चित्राला सर्वाधिक किंमत मिळाली आहे. बगदाद येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना बुश यांच्या दिशेने इराकी पत्रकार मुंतझेर याने बूट फेकून मारला होता. त्यानंतर मुंतझेर याला कांही महिने तुरूंगवासाची शिक्षा भोगावी लागली होती.

या लिलावात २२ देशांतील कलाकारांच्या कलाकृती मांडल्या गेल्या होत्या. त्यातील १२ कलाकारांच्या कलाकृतींना विक्रमी किंमती मिळाल्या. कटरा या सांस्कृतिक शहरात हा लिलाव भरविला गेला होता. त्यात भारतीय शिल्पकार अनीश कपूर यांच्याही कलाकृती मांडल्या गेल्या होत्या.

Leave a Comment