नोव्हेंबरपासून स्टेट बॅंक एटीएमची नवीन नियमावली

sbi
नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) नवीन नियम जारी करत एटीएमच्या मोफत वापराच्या मर्यादा वाढविल्या आहेत. त्यामुळे जे खातेदार बॅंकेच्या शाखेत कमीत कमी वेळा जातात किंवा ज्याच्या खात्यात जास्त रक्कम आहे त्यांना इतर ग्राहकांपेक्षा अधिक वेळा एटीएम सेवेचा मोफत वापर करता येणार आहे. एक नोव्हेंबरपासून लागू होणार्‍या एसबीआयच्या नवीन नियमावलीत सांगण्यात आले आहे की, ज्या खातेदारांच्या खात्यात २५,००० रुपयांपर्यंतची रक्कम असेल असा खातेदारांना बॅंकेच्या एटीएममधून केवळ चार वेळा मोफत पैसे काढता येणार आहेत. मात्र, ज्या खातेदारांच्या खात्यातील सरासरी रक्कम २५,००० किंवा त्यापेक्षा जास्त असेल असा खातेदारांकडून बॅंक एटीएम वापरासाठी कोणतेही शुल्क आकारणार नाही. असे असले तरी या ग्राहकांना दुसर्‍या बँकेच्या एटीएम महिन्यातून फक्त तीन वेळाच मोफत पैसे काढता येणार आहेत. याशिवाय एखादा ग्राहक महिन्यात एकदाही बॅंकेच्या शाखेत जात नसेल तर त्या ग्राहकाला महिन्यातून पाच ते नऊ वेळा बॅंकेच्या एटीएमचा मोफत वापर करता येणार आहे. तर ज्या खातेदारांच्या खात्यात एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल त्यांना एटीएमचा अमर्यादित मोफत वापर करता येणार असून ही सुविधा संपूर्ण देशात लागू असेल. तसेच २५,००० रुपयांपेक्षा कमी रक्कम खात्यात असणार्‍या ग्राहकांना बॅंकेचे एटीएम महिन्यातून पाच वेळा मोफत वापरता येणार असून दुसऱ्या बँकेचे एटीएम महिन्यातून तीन वेळा मोफत वापरता येणार आहे. या नंतर एसबीआय एटीएमच्या प्रत्येक वापरासाठी ग्राहकांकडून पाच रुपये आणि दुसर्‍या बॅंकेच्या एटीएम वापरासाठी २० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडे १२.५९ कोटी एटीएमधारक आहेत. ही संख्या देशातील एकूण ४०.५९ कोटी कार्डधारकांच्या ३१ टक्के इतकी आहे. याशिवाय देशातील एकूण १.६६ लाख एटीएम मशीन्सपैकी २७ टक्के म्हणजेच ४४,९२९ एटीएम मशीन्स या एसबीआयच्या आहेत ज्यांमधून देशातील एकूण एटीएम व्यवहारांपैकी ४१ टक्के व्यवहार केले जातात.

Leave a Comment