डेंग्यूसदृश आजाराने चार मुले दगावली

dengue1
यवतमाळ – डेंग्यूसदृश आजाराने चार बालकांचा मृत्यू झाल्याची घटना उमरखेड तालुक्यातील धानोरा (सा) येथे घडली. गेल्या काही दिवसांपासून या गावात तापाचे अनेक रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मिनाज शे.मन्नान, महंमद कय्युब अ.सत्तार, दुर्गा ज्ञानेश्वर काळे, केतन दीपक गिरीअशी या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या बालकांची नावे आहेत. या बालकांचा मृत्यू दोन दिवसाच्या फरकाने झाला. गेल्याकाही दिवसांपासून ताप येणे, पेशी कमी होणे यामुळे अनेक जण त्रस्त आहेत. याबाबत गावकर्‍यांनी आठ दिवसापूर्वीच आरोग्य विभागाला कळविले होते. परंतु दखल घेतली नाही. परिणामी गावातील चार बालके दगावल्याचा नागरिकांचा आरोप आहे. गावातील अनेक जण उमरखेड, पुसद, नांदेड येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. गावकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले असून धानोरा गावात तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांसह पथक दाखल झाले आहे. गावकर्‍यांना आरोग्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य पथकाकडून गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत आणि सार्वजनिक पाण्याच्या वितरण प्रणालीतून नमुने घेतले जात आहे. नजीकच्या गावांमध्येही हा आजार बळावू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment