किरकोळ बाजारात महागाईचा मुक्काम दिवाळी संपेपर्यंत ?

market
मुंबई – ताज्या आकडेवारीनुसार महागाईचा दर मागील पाच वर्षांतील निचांक पातळीवर असल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक २.७८ टक्के इतका कमी झाल्याचे दिसून आले आहे. ऑगस्ट महिन्यात तो ३.७४ टक्के होता. आकडेवारी पाहिली तर ही परिस्थिती समाधानकारक आहे असेच म्हणावे लागेल. मात्र प्रत्यक्षात वस्तूस्थिती काही वेगळीच आहे. आकड्यांमध्ये महागाई कमी झाल्याचे दिसत असले तरी दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारातील प्रत्यक्षातील वस्तूंचे दर कमी झाल्याचे दिसून येत नाही. घाऊक महागाई दराचा थेट परिणाम किरकोळ बाजारपेठांवर होत असतो. मात्र अनेकदा घाऊक व्यापारांच्या किंमती कमी झाल्यानंतर देखील किरकोळ बाजारातील दलाल, व्यापारी आणि अडते नफेखोरी करत असल्याने ग्राहकांपर्यंत स्वस्ताईतील अच्छे दिन पाहण्याचे भाग्य मिळत नाही. केंद्र किंवा राज्य सरकारचे किरकोळ वस्तूंच्या बाजारावर थेट नियंत्रण नाही. साठेबाजी आणि नफेखोरी करणा-या किरकोळ व्यापा-यांवर अत्यावश्यक वस्तू विनियमन कायद्यांर्गत कारवाई करण्याचे प्रमाण फारच कमी आहे. आकडे भले काहीही सांगोत बाजारपेठांमधील वस्तूंचे दर जसेच्या तसे राहिले आहेत. त्यामुळे बातम्यांमध्ये महागाई कमी झाली असली तरी बाजारातून ती ग्राहकांसाठी कायम आहे.

Leave a Comment