आता प्रतिक्षा १९ तारखेची

voters
मुंबई – १५व्या विधानसभेकरिता राज्यात झालेल्या मतदानात सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी ६२ टक्के मतदान झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आज सकाळी अत्यंत धीम्या गतीने मतदानाला सुरुवात झाली. शहरी भागातील मतदार दुपारनंतर मतदान केंद्रांकडे फिरकले तर ग्रामीण भागात दुपारी १२ नंतर मतदारांनी गर्दी केली. सकाळी नऊ वाजता राज्यातील ग्रामीण भागात १० टक्के सरासरी मतदानाची नोंद करण्यात आली. त्याचवेळी शहरी भागात चार ते पाच टक्के मतदान झाले होते. विदर्भातील अनेक मतदारसंघात मुसळधार पावसामुळे सकाळी मतदानाची टक्केवारी कमी होती. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सरासरी १० टक्के मतदान नोंदविण्यात आले. आज झालेल्या मतदानात अनेक सेलिब्रिटींजनी मतदान केले. किरकोळ घटना वगळता महाराष्ट्रात सर्वत्र शांततेत मतदान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. नगर जिल्ह्यात लोणी तालुक्यात रस्त्याच्या कामाची मागणी करून ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला. नाशिक जिल्ह्यात दुपारी १२ वाजेपर्यंत सरासरी २५ ते ३० टक्के मतदान झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मतदान करताना प्रचारात नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली. दुपारी एक वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची गती कमी होती. दुपारनंतर मतदानाला वेग आला. धारावी विधानसभा मतदारसंघात काही मतदान केंद्रांवर वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर देखील मतदान सुरु होते. गडचिरोलीत नक्षलग्रस्त भागात सकाळी शांततेत मतदान सुरु होते. अहेरी मतदारसंघातील चामोरशी येथे नक्षलवाद्यांनी मतदान केंद्रावर हल्ला करून ते उधळण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. गडचिरोलीत राज्यातील सर्वाधिक ४४ टक्के मतदान दुपारी तीन वाजेपर्यंत नोंदविण्यात आले. यवतमाळ येथे ईव्हीएम मशीनला धक्का लागल्यावरून जिल्हा परिषद सदस्य रत्ना आडे यांनी मतदान अधिकार्‍याला मारहाण केली. मुंबईतील चेंबूर येथे कॉंग्रेस कार्यकर्ता निळोबा सरोदे याला पैसे वाटताना पोलिसांनी अटक केली. तर महाडमध्ये निवडणूक कर्मचारी योगेश भिसे यांचा निवडणूक कर्तव्यावर असतानाच हृद्यविकाराने मृत्यू झाला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुंबईत सरासरी ४० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. वांद्रे मतदारसंघात ३०० बोगस मतदान ओळखपत्र पकडण्यात आली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

राज्यातील २८८ विधानसभा जागांकरिता ४,११९ उमेदवारांचे भाग्य आज मतदारयंत्रात बंद झाले. यामध्ये ३,८४३ पुरुष उमेदवार आणि २७६ महिला उमेदवारांचा समावेश आहे. सर्वसामान्य श्रेणीतील २३४, अनुसुचित जातींकरिता २९ आणि अनुसुचित जमातींकरिता २५ राखीव जागांचा समावेश आहे. ८३ विधानसभा मतदारसंघात १५ पेक्षा जास्त उमेदवार आहेत. एकूण ०८ कोटी ३५ लाख ३८ हजार ११४ मतदार असून त्यात ०४ कोटी ४० लाख २६ हजार ४०१ पुरुष तर ०३ कोटी ९३ लाख ६३ हजार ०११ महिला मतदार आहेत. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३९ उमेदवार असून सर्वात कमी पाच उमेदवार कोकणातील गुहागर विधानसभा मतदारसंघात आहेत. सकाळी १२ वाजेपर्यंत महाराष्ट्रात १९ टक्के तर हरियाणात २९ टक्के मतदान झाले होते. सकाळी सात ते संध्याकाळी सहा अशी मतदानाची वेळ असताना सकाळी मतदानाला धिम्या गतीने सुरुवात झाली. विदर्भातील अनेक मतदारसंघात मुसळधार पाऊस झाल्याने मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम झाला. अनेक मतदारसंघात सकाळी मतदान यंत्रे बंद पडण्याच्या घटना घडल्या असून नागपूर, नाशिक आणि मुंबईतील शिवडी येथील बंद पडलेली यंत्रे बदलण्यात आली आहेत. या निवडणूकीकरिता भारतीय जनता पक्षाने २८०, बहुजन समाज पक्षाने २६०, कॉंग्रेसने २८७, राष्ट्रवादी कॉंग्रेसने २७८, शिवसेनेने २८२, मनसेने २१९, भाकपने ३४, माकपने १९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रीय आणि प्रादेशिक मान्यता प्राप्त पक्षांशिवाय नोंदणीकृत पक्षांचे ७६१ उमेदवार रिंगणात आहेत. तर १६९९ अपक्ष उमेदवारांनी निवडणूकीत भाग घेतला आहे. मुंबईतील वडाळा या मतदारसंघात सर्वात कमी एक लाख ९६ हजार ८५९ मतदार आहेत. निवडणूक आयोगाचे १३५ निरीक्षक, ११२ विशेष निरीक्षक, पाच पोलीस निरीक्षक, १८ जागरुकता निरीक्षक या मतदानावर देखरेख करत असून एकूण पाच लाख ८४ हजार ६१७ मतदान कर्मचारी ९१,३७६ मतदान केंद्रांवर कार्यरत आहेत.

हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी १३५१ उमेदवार रिंगणात असून १.६३ कोटी मतदार त्यांच्या भाग्याचा निर्णय घेणार आहेत. मतदानाकरिता १६,३५७ मतदान केंद्र बनविण्यात आली आहेत. या निवडणूकीत भाजप आणि कॉंग्रेसने सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे केले असून बसपा, भाकप आणि माकपने ८७, १४ आणि १७ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. महाराष्ट्रातील या निवडणूकीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय होणार असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आर.आर.पाटील आणि छगन भुजबळ हे देखील निवडणूक रिंगणात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, माजी विधानसभा विरोधी पक्षनेता एकनाथ खडसे, विधान परिषद विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांच्याशिवाय ज्येष्ठ मंत्री शिवाजीराव मोघे, पतंगराव कदम, राजेंद्र दर्डा यांच्या राजकीय वाटचालीचा निर्णय मतदार घेणार आहेत. शिवसेनेचे सुभाष देसाई, सुरेश जैन, दीपक केसरकर तर मनसेचे बाळा नांदगावकर, प्रवीण दरेकर इत्यादी महत्वाच्या उमेदवारांचा राजकीय प्रवास या निवडणूकीच्या निकालातून ठरणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघात लोकसभेच्या एका रिक्त जागेसाठी निवडणूक होत असून दिवंगत भाजप नेता गोपीनाथ मुंडे यांच्या रिक्त जागेवर त्यांच्या कन्या प्रितम खाडे-मुंडे निवडणूक लढवत आहेत. निवडणूकीनंतर भाजप-शिवसेना एकत्र येऊन सत्तेत येण्याबाबतच्या शक्यतेवर बोलण्यास शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी नकार दिला आहे. ते म्हणाले की, याबाबतचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील. जळगावमध्ये घरकुल घोटाळ्यात आरोपी असलेले माजी मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर हे तुरुंगातून निवडणूक लढवत असून मतदान करण्यासाठी त्यांना तुरुंग प्रशासनाने परवानगी न दिल्याने ते स्वतः मतदान करू शकले नाही. अनेक सेलिब्रिटींजनी सकाळी लवकर मतदान करून आपला लोकशाहीतील हक्क बजावला. त्यात अभिनेत्री रेखा, जया बच्चन, अभिषेक बच्चन, अतुल कुलकर्णी, सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आदी नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर अहमदनगरमध्ये अण्णा हजारे, पुण्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे, सुबोध भावे, सुधीर गाडगीळ, मुक्ता बर्वे, खासदार अनिल शिरोळे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे, चंद्रपूरमध्ये आमटे परिवार, संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात, नवी मुंबईत गणेश नाईक आणि परिवार, कोल्हापूरात सतेज पाटील. मुंबईत अनिल अंबानी, सचिन तेंडुलकर, मिलिंद देवरा, जावेद अख्तर, किरण खेर या मान्यवरांनी देखील आज झालेल्या विधानसभा निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावला.

राज्यातील मतदानाची टक्केवारी – नांदेड- ४८ %, पुणे- ४५.२९ %, सातारा- ४९.४९ %, औरंगाबाद- ४३ %, अकोला- ३६ %, वाशिम- ३९.०८ %, धुळे- ४०.३३ %, बीड- ४९.३० %, वर्धा- ४१ %, सांगली- ५२.५९ %, भंडारा- ४४ %, सोलापूर- ४५.८६ %, धुळे- ४०.३३ %, यवतमाळ – ४३.३१ %, मुंबई शहर – ३७.५ %, नंदुरबार- ४३.७८ %, बुलडाणा- ४३ %, मुंबई शहर- ३७.५%, परभणी- ५२.१६%, लातुर ४९.३२%, ठाणे -२८.३१%, नागपूर- ४० %, चंद्रपूर- ४३.२३%, जालना- ४९.१० % हिंगोली – ६२.८० %, कोल्हापूर -५७.०७%, अहमदनगर – ४६.४२ %, अक्कलकोट – ६०%, सोलापूर शहर उत्तर – ५१.३८%, बार्शी – ५८.०५%, सोलापूर शहर मध्य – ५२.५९%, मोहोळ – ६१.३१%, सांगोला – ६७.०४%, माळशिराज – ६३.१२%, पंढरपूर – ७०.२३%, करमाळा – ७०.२०%, माढा – ७१.२१%, सोलापूर शहर दक्षिण – ५५.१८%

Leave a Comment