हुदहुद चिमणीच्या नावाच्या वादळाने माजवला आकांत

hudhud
हुदहुद वादळाने आंध्र आणि ओरिसा राज्यात दहशत माजवली आहे.हे वादळ प्रलयंकारी ठरले असले तरी त्याचे नांव पडले आहे एका छोट्या चिमणीवरून. अरबी भाषेत हुपू नावाची चिमणी असून तिचे अन्य भाषेतील नाव हुदहुद असे आहे. हे नांव ओमान मध्ये ठेवले गेले आहे. हुदहुद हा रंगीबेरंगी पक्षी इस्त्रायलचा राष्ट्रीय पक्षी आहे तर भारतात या पक्ष्याला कठफोडवा म्हटले जाते. अफ्रिका युरेशियातही हा पक्षी आढळतो.

ज्या प्रमाणे नावावरून माणसांची ओळख पटते त्याचप्रमाणे सर्वसामान्य लोकांना वादळाची सूचना देताना ती विशिष्ठ व परिचित नावावरून दिली जावी या कल्पनेने वादळांना नांवे दिली जाण्याची प्रथा सुरू झाली. त्सुनामी, कटरिना, सँडी ही तुफानांचीच नांवे त्यातूनच जन्माला आली. चक्रीवादळांना स्त्रियांची नांवे देण्याची प्रथा १९५० सालापासून सुरू झाली.त्यापूर्वी १९४६ ए, १९४६ बी अशी वर्षांवरून नांवे दिली जात होती. १९७९ नंतर पुरूषांची नांवेही या वादळांना दिली जाऊ लागली. १९५३ पर्यंत मायामी नॅशनल हेरिकेन सेंटर व वर्ल्ड मेटेरिऑलॉजी ऑरगनायझेशन ही नावे देत असे मात्र हे पॅनल २००४ मध्ये भंग केले गेले व आपापल्या प्रांतातील वादळांना त्या त्या प्रांतातील देशांनी नांवे देण्याची मुभा दिली गेली. त्यानुसार उत्तर हिंद महासागरातील बांगला देश, भारत, मालदिव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड अशा आठ देशांच्या गटाने प्रत्येकी ८ नांवे निश्चित केली. यंदाच्या वादळाला नांव देण्याची पाळी ओमानची होती.

यात मजेची बाब अशी की १९५० ते २०१२ या काळात आलेल्या वादळांच्या नावांचे संशोधन करताना असे आढळले आहे की महिलांची नांवे असलेली वादळे पुरूषांच्या नावाच्या वादळांपेक्षा अधिक प्रलयंकारी ठरली आहेत. या काळात महिैलांची नांवे असलेली ४७ वादळे आली आणि त्यात पुरूषांच्या नावे असलेल्या वादळात जितके मृत्यू झाले त्याच्या दुप्पट मृतांची संख्या नोंदली गेली.

Leave a Comment