सॅमसंगची ‘दिवाळी भेट’, बाजारात दाखल दोन ‘स्मार्ट’ उत्पादने

samsung
मुंबई – इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन करणार्‍या सॅमसंग कंपनीतर्फे मंगळवारी ‘गॅलेक्सी नोट ४’ हा नवा स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच ‘गियर एस ’ भारतीय बाजारात दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या दोन उत्पादनांची किंमत अनुक्रमे ५८,३०० रुपये आणि २८,९०० रुपये इतकी आहे. सॅमसंगचे मोबाइल आणि माहिती-तंत्रज्ञान विभागाचे भारतातील उपाध्यक्ष असीम वारसी यांनी सांगितले की, गॅलेक्सी नोट ४ या स्मार्टफोनची स्क्रीन ५.७ इंचांची आहे. या फोनमध्ये १६ मेगापिक्सल क्षमतेचा मुख्य कॅमेरा बसविण्यात आला असून पुढील बाजूस सेल्फीप्रेमींचा विचार करून ३.७ मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा बसविण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ऍण्ड्रॉइड ४.४ किटकॅट कार्यप्रणालीवर काम करत असून या फोनच्या बरोबर नवीन ‘एस पेन’ देखील ग्राहकांना देण्यात येत आहे. ज्यामुळे या स्मार्टफोनवर सहजपणे काम करणे शक्य होत आहे, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, २ जी आणि ३ जी तंत्रज्ञानासोबतच हा स्मार्टफोन ४ जी तंत्रज्ञानावर देखील काम करत असून या फोनमध्ये २.७ गीगाहर्टझ क्षमतेचा क्वाड कोअर प्रोसेसर बसविण्यात आला आहे. तसेच या फोनची रॅम तीन गीगाबाईट क्षमतेची असून फोनची अंतर्गत साठवणूक क्षमता ३२ जीबी इतकी आहे. ही क्षमता एसडी मेमरी कार्डच्या साहाय्याने ६४ जीबीपर्यंत वाढविणे शक्य होणार आहे. तसेच यावेळी कंपनीतर्फे हा दावा करण्यात आला आहे की, या स्मार्टफोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य या फोनची बॅटरी असून अवघ्या ३० मिनिटांत या स्मार्टफोनची बॅटरी ५० टक्क्यांपर्यंत चार्जिंग होते. याशिवाय हा फोन १४ भारतीय भाषांमध्ये काम करता येते. याशिवाय गियर एस या स्मार्टवॉचसंदर्भात माहिती देताना वारसी यांनी सांगितले की, गियर एस हा थ्रीजी तंत्रज्ञानावर आधारित असून यामध्ये सिम स्लॉटचा पर्याय देण्यात आला असून याचा उपयोग स्वतंत्ररित्या देखील केला जाऊ शकतो. त्यामुळे या स्मार्टवॉचच्या साहाय्याने कॉल करण्याबरोबरच एसएमएस आणि ई-मेल देखील पाठविता येणे शक्य होणार आहे. या स्मार्टवॉचची स्क्रीन दोन इंचाची असून यामध्ये ५१२ एमबी रॅम आणि चार जीबी अंतर्गत साठवणूक क्षमता आहे.

Leave a Comment