
पुणे – सुशिक्षित, साक्षर लोकांना सुसंस्कृत समजण्यात येते. मात्र आजच्या सुशिक्षितांकडूनच सगळ्यात जास्त फसवणूक करण्यात येत आहे. यामुळे निरिक्षरांची चळवळ परपडते अगदी नक्षलवादी चळवळही आजच्या सुशिक्षितांपेक्षा जास्त सुसंस्कृत आहे. कारण त्यांची लढाई हक्कांसाठी असते. वेगवेगळ्या संस्कृतीच्या आक्रमणाने आपली वाचन परंपरा बिघडली असून विविध देशांमधील साहित्याच्या वाचनाकरिता वाचकाने प्रादेशिक, देशीय, सीमावाद सोडायला हवा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केले. अक्षरधाराच्या ५२५ व्या ग्रंथोत्सवाचा शुभारंभ आणि “कोसला’ कादंबरीच्या विशेष आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात डॉ. नेमाडे बोलत होते.
वाचन संस्कृती विषयी बोलताना डॉ. नेमाडे म्हणाले, साहित्याची मागणी ही वाचकांकडून होत असते. वाचणारे डोळे वाढले की साहित्यामध्ये महत्वाचे बदल होत असतात. पूर्वी युरोपियन साहित्य फक्त इंग्रजीत मिळायचे. आज ते साहित्य मराठीत भाषांतरीत होत आहे. यामुळे सर्व साहित्य प्रकारांचा आस्वाद मराठी वाचकांना घेता येत आहे. तसे झाले तरच भाषा प्रगत होते आणि वाचकांमध्ये प्रगल्भता येते आणि मानवी जीवनातील जाणिवांचा स्तर उंचावतो.
वाचनासाठी वाचकाने प्रादेशिक, देशीय, सीमावाद सोडायला हवा – भालचंद्र नेमाडे
लिखित म्हणजेज प्रमाण मानणे हा मुद्रण कलेमुळे झालेला तोटा आहे. मुद्रित माध्यमाने भाषेबाबत अनेक गोंधळ निर्माण केले. मुद्रित संस्कृतीने खोटे इतिहास लिहिले जातात. मात्र मुद्रित संस्कृतीला होणारा विरोध हा नैसर्गिक म्हणावा लागेल. पाश्चिमात्य देशांतील साहित्य आणि साहित्य `याक डे’ संस्कृतीतील बदल यादृष्टीने पाहिल्यास वाचकाला आपल्या वाचन विचारातील बदल कळतील, असे नेमाडे म्हणाले.
