राज यांना परप्रांतियांच्या विधानाबाबत नोटीस

raj
मुंबई – घाटकोपर येथील प्रचारसभेत परप्रांतियांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. अमराठी लोकांविरुद्ध काढलेले उद्गार आचारसंहितेचा भंग करणारे असल्याचे सांगत आयोगाने ही नोटीस जारी केली आहे. तसेच या नोटीशीला उत्तर देण्यासाठी राज यांना गुरूवारी सकाळपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. या कालावधीत उत्तर न आल्यास थेट कारवाईची करण्याचा इशाराही आयोगाने दिला आहे.

मनसेच्या नाशिकमधील प्रचारसभा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्याने राज यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. हा वाद अद्याप थंडावला नसताना अमराठी भाषिकांवर केलेल्या वक्तव्यामुळे राज पुन्हा अडचणीत आले आहेत. सत्तेवर आल्यावर पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्व नोकऱ्या केवळ मराठी तरुण-तरुणींना देऊ, परराज्यातील कोणालाच नोकरी मिळणार नाही. परराज्यातील लोंढे थांबवू. ज्या ट्रेनने ते येत असतील, त्यातच त्यांची चौकशी सुरू होईल. राहण्याची आणि कामाची सोय नसेल तर महाराष्ट्रात येऊ नका. महाराष्ट्राने तुम्हाला पोसण्याचा ठेका घेतलेला नाही, केवळ मराठींनाच नोकऱ्या मिळायला हव्यात, असे वक्तव्य राज यांनी केले होते. त्यामुळे असे वक्तव्य करणे आचारसंहितेचा भंग करणारे असल्याने निवडणूक आयोगाने राज ठाकरे यांना नोटीस पाठविली आहे.

Leave a Comment