मोदी सरकारविरोधात दोन जनहित याचिका दाखल

parliment
मुंबई – भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारवर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करावी, या मागणीसाठी आज मुंबई उच्च न्यायालयात दोन स्वतंत्र जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. भाजपने प्रचारादरम्यान आघाडी सरकारवर १०२ घोटाळे, त्यातील ११ लाख ८८ हजार कोटींचा कथित भ्रष्टाचार आणि १५ वर्षात ५० हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे आरोप केले होते. गुजरात लडायक मंच संघटनेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश जोशी यांनी या याचिका दाखल केल्या आहेत. रमेश जोशी म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांना मी ६ ऑक्टोबरला एक पत्र पाठवले होते. त्यात महाराष्ट्रातील १०२ घोटाळे आणि ५० हजार शेतक-यांच्या आत्महत्यांच्या सीबीआय चौकशीसाठी मोदींना तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. तसेच या मागणीवर केंद्र सरकारने मुदतीत अपेक्षित कार्यवाही न केल्यास मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही दिल्याचे जोशी यांनी सांगितले. या आरोपांची सीबीआय चौकशी करणे, हे मोदी सरकारचे कर्तव्य होते. मात्र विधानसभा निव़डणुकीत प्रचाराकरिता घोटाळ्यांचा वापर करता यावा. म्हणून मोदींनी सीबीआय चौकशीचे आदेश देणे टाळले, असा आरोप जोशी यांनी केला आहे.

Leave a Comment