मतदानपूर्व सट्टा बाजाराला वेग

vidhansabha
मुंबई- विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढवित असल्याने सट्टा बाजारात संभ्रमाचे वातावरण होते. मात्र आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून मतदान उद्यावर येऊन ठेपले आहे. दरम्यान प्रत्येक पक्षाने आणि त्यांच्या उमेदवाराने `किसमे कितना है दम…’ दाखवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे बुकींनी मतदानपूर्व सट्टा बाजारात भाव घेण्यास सुरुवात केली आहे. बहुतांश मतदारसंघातील लढती चुरशीच्या असून, उमेदवारांसाठी ५० पैशांपासून पाच रुपयांपर्यंत भाव देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होऊन २० दिवस उलटल्यावरही औरंगाबाद शहरातील सट्टा मार्केटमध्ये कोणत्याही स्वरुपाची हालचाल जाणवत नव्हती. गेल्या तीन दिवसांपासून सट्टा बाजारात हालचाल सुरू झाली. सट्टा लावणा-यांनी स्थानिक उमेदवारांऐवजी राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा येणार, यावर भर दिला होता. परिणामी स्थानिक उमेदवारांचे भाव काढण्यात आले नव्हते. अखेरच्या दोन ‌दिवसांत सटोडियांनी शहरातील उमेदवाराचे भाव काढले आहेत. निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र उभे आहेत. मात्र सट्टा बाजारात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस व एमआयएम या पक्षाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले असल्याचे दिसून आले आहे. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात ५० पैशांपासून ते दिड रुपयापर्यंत भाव देण्यात आला आहे. तर पूर्व मतदारसंघात ६० पैशांपासून ते पाच रुपयांपर्यंत भाव देण्यात आला असल्याची माहिती सट्टा बाजारातील सूत्रांनी दिली. उमेदवारांचे भाव जाहिर करण्यात आल्यानंतर सटोडियांनी पेमेंट सुरुवातीलाच घेण्यावर भर दिला आहे. क्रिकेटच्या सट्ट्यामध्ये मध्यस्थांच्या सांगण्यानुसार हवाला घेऊन रक्कम विश्वासाने लावण्यात येते. त्याचे पेमेंट नंतर करण्यात येते. परंतू सटोडियांकडून निवडणुकीच्या सट्ट्यात सुरुवातीला रक्कम जमा करून घेण्यात येत आहे, अशी माहिती दिली.

Leave a Comment