पृथ्वीराज यांच्या कबुलीमुळे भाजपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध : रूडी

rudi
मुंबई – सत्तेच्या राजकारणामुळे आपण काँग्रेसच्या तीन माजी मुख्यमंत्र्यावर आदर्शप्रकरणी व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याविरोधात सिंचन घोटाळा प्रकरणी भ्रष्टाचारविरोधी कारवाई करू शकलो नाही. त्यांच्यावर कारवाई केली असती तर आघाडी सरकार कोसळले असते आणि काँग्रेस पक्ष उध्वस्त झाला असता अशी कबुली काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. या कबुलीमुळे भारतीय जनता पार्टीआघाडी सरकारवरकरत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत, असे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे प्रभारी राजीवप्रताप रूडी यांनी आज सांगितले. मुंबई येथे भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

राजीवप्रताप रूडी यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीपर्यंत राज्याच्या मुख्यमंत्रिपदी असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी एका प्रमुख वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराची कबुली दिली आहे.ते म्हणाले की, आदर्शप्रकरणी विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे व अशोक चव्हाण हे काँग्रेसचे तीन माजी मुख्यमंत्री व पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेते अडचणीत आले होते. आपण त्यांच्याविरोधात कारवाई केली असती तर महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष उद्धवस्त झाला असता. आपण त्यांना तुरुंगात पाठवले असते तर पक्षाच्या संघटनेला धक्का बसला असता. पक्षात फूट पडली असती. यापूर्वी कोणी हा मुद्दा उघडपणे मांडला नाही. आपण स्वतःसुद्धा हा मुद्दा स्पष्टपणे मांडला नाही, अशी कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.राजीवप्रताप रूडी यांनी सांगितले की, पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचन घोटाळ्याबाबत अशी कबुली दिली आहे की, काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर दहा वर्षांत सिंचनावर ४२ हजार कोटी खर्च झाले पण सिंचनात वाढ झाली नाही. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार जलसंपदामंत्री होते. आमच्या सरकारकडे बोट दाखवले गेले. पण आपण आघाडी टिकविण्यासाठी पोलीस चौकशी अथवा न्यायालयीन चौकशीचा आदेश देण्याऐवजी केवळ जलसंपदा खात्याला श्वेतपत्रिका काढण्यास सांगितले. श्वेतपत्रिकेच्या निष्कर्षांवरून चौकशी आयोग नेमता आला असता. अजित पवार यांना न्यायालयीन आयोगासमोर पाचारण करून त्यांचा जाब घ्यावा असा आग्रह मला धरता आला असता. पण मी आघाडी सरकार चालवत होतो व माझे हात बांधलेले होते. अजित पवार यांना आपण क्लीन चीट दिलेली नाही. त्यांना मंत्रिमंडळातून काढले असते तर सरकार कोसळले असते.रूडी म्हणाले की, काँग्रेसच्याच माजी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या कबुलीमुळे आता भाजपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत. पक्षाला आता आणखी काही पुरावा देण्याची आवश्यकता नाही.या विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment