दुबईत बसले हॅपीनेस मीटर

meter
दुबई – सरकारी सेवांचा वापर करणारे नागरिक या सेवांबाबत किती समाधानी आणि आनंदी आहेत याची पडताळणी करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीने दुबईत हॅपीनेस मीटर बसविले आहेत. ही अशी प्रणाली स्थापन करणारे दुबई जगातील पहिले शहर बनले आहे.

हॅपीनेस मीटर हे सेंट्रल नेटवर्कशी संबंधित इलेक्ट्रोनिक उपकरण आहे. हे उपकरण नागरिकांच्या समाधानाची पातळी मोजू शकते. या मीटरवर नोंदले गेलेले नागरिकांच्या पसंती नापसंतीचे आकडे दररोज या मशीनच्या निर्मात्यांकडे पाठविले जाणार आहेत. कोणत्या सरकारी सेवा अधिक लोकप्रिय आणि समाधानकारक आहेत, कोणत्या भागात कोणत्या सरकारी सेवांमुळे नागरिक अधिक आनंदी आहेत हे यामुळे समजू शकणार आहे.

यूएईचे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मख्तूम यांच्या हस्ते या हॅपीनेस मीटरचे उद्घाटन करण्यात आले. सलग तीन महिने या मशीनमधून प्राप्त झालेले अहवाल तपासले जाणार असून त्यानुसार सरकारी सेवांतील बदल ठरविले जाणार आहेत. जग अतिशय वेगाने बदलत आहे आणि त्यामुळे नागरिकांनाही जलद बदलांची अपेक्षा आहे. सरकारी सेवांवर त्यामुळेच लक्ष ठेवणे अधिक आवश्यक बनले असल्याचे उपराष्ट्रपतींनी या वेळी बोलताना नमूद केले.

Leave a Comment