चीनी फटाक्यांना टक्कर देण्यासाठी भारतीय फटाक्यांचे नवे प्रकार

cracker
शिवकाशी – ‘मेक इन इंडिया’ या मोदी सरकारच्या घोषणेला धाब्यावर बसवून भारतीय बाजारात जम बसवलेल्या चीनी फटाके उद्योगाला टक्कर देण्यासाठी तामिळनाडूतील एका फटाका निर्माता कंपनीने कंबर कसली आहे. ३ हजार कोटींचा देशांतर्गत फटाका व्यवसाय वाचवण्यासाठी त्यांनी फटाक्यांचे नवे प्रकार तयार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. फटाका निर्माते आणि विक्रेत्य़ांनी सांगितले की, दिवाळीच्या सणानिमित्त बाजारात आठ नव्या फटाक्यांचे प्रकार सादर करण्यात येत असून, त्यांची किंमत २,१५० ते ११,३५० दरम्यान असणार आहे. स्थानिक फटाके विक्रेता शिवेंद्रने सांगितले की, ‘पॅनरोमा ५००’ नावाचा एक नवा फटाका बाजारात दाखल करण्यात आला असून, ५०० सेकंदांपर्यंत तो फुटणार आहे. त्याची किंमत ११,३५० रुपये ठेवण्यात आली आहे. बुलेट ट्रेन नावाचादेखील एक नवा फटाका तय़ार करण्यात आला असून, यांसारखे अनेक फटाके चीनी फटाक्यांना टक्कर देण्यासाठी बाजारात उतरवण्यात आले आहेत. तामिळनाडू फटाका उत्पादक संघटनेचे महासचिव सुंदर यांनी दावा केला आहे की, चीनी फटाके स्वस्त निश्चितपणे असतात. मात्र ते पर्यावरणासाठी धोकादायक असतात. भारतीय फटाके तुलनेने महाग असतात. परंतु ते पर्यावरणाच्या दृष्टीने तुलनात्मकरित्या सुरक्षित असतात. भारतीय फटाके उत्पादक फटाका उत्पादनात वृत्तपत्र, कागद, कार्डबोर्ड आणि जूटसारख्या कच्च्या मालाचा वापर करतात. मात्र चीनी फटाक्यांच्या निर्मितीत क्लोरेट या रासायनिक पदार्थाचा वापर केला जातो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चीनी फटाके अधिक घातक ठरू शकतात. फटाक्याच्या उत्पादनासाठी चीनी कंपन्या पोटॅशियम क्लोरेटचा वापर करतात, ज्याची किंमत ५० रुपये प्रतिकिलोग्रॅम आहे. तर भारतीय फटाक्यांमध्ये अँल्युमिनियन पावडरचा वापर केला जातो, ज्याची किंमत ३०० रुपये प्रतिकिलोग्रॅम आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment