किरकोळ आणि घाऊक बाजारात महागाईचा दर घसरला

market
नवी दिल्ली – भाज्यांसहित इतर खाद्यपदार्थांच्या किंमतीत सातत्याने होणारी घसरण आणि इंधनाच्या दरात झालेली कपात यांमुळे सप्टेंबर महिन्यातील घाऊक महागाई दराचा निर्देशांक पाच वर्षांच्या निच्चांकी स्तरावर म्हणजेच २.३८ टक्क्यांवर पोहोचला. मागील ऑगस्ट महिन्यात हाच दर ३.७४ टक्के आणि गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हाच दर ७.०५ टक्के इतके होता. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या सप्टेंबर महिन्याच्या किरकोळ महागाई दराने निच्चांकी स्तर गाठल्यानंतर आज जाहीर करण्यात आलेल्या घाऊक महागाई दराने देखील मागील अडीच वर्षांचा निच्चांकी स्तर गाठल्याने देशातील नागरिकांकडून ‘अच्छे दिन…’ची चाहूल लागत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातर्फे आज जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनंतर ही बाब स्पष्ट झाली आहे. या आकडेवारीनुसार, अन्नधान्याचा महागाई दर गेल्या अडीच वर्षांतील निच्चांकी स्तरावर पोहोचला असून सप्टेंबर महिन्यात हा दर ३.५२ टक्के इतका नोंदविण्यात आला. मे महिन्यानंतर प्रथमच अन्नधान्याच्या महागाई दरात घसरण पाहायला मिळाली. सप्टेंबर महिन्यात भाज्यांच्या किंमतीत १४.९८ टक्क्यांची तर कांद्याच्या किंमतीत ५८.१२ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. असे असले तरी, बटाट्याच्या किंमतीत याच महिन्यात ९०.२३ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. तर तांदूळाच्या किंमतीत याच कालावधीत ६.८७ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. याशिवाय सप्टेंबर महिन्यात फळांच्या किंमती २०.९५ टक्क्यांनी तर अंडी, मांस आणि मासे ४.१२ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे.

Leave a Comment