उद्धव यांची तडफड सुरुच

uddhav
मुंबई – १५ दिवस निवडणूक प्रचाराच्या धडाक्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला अफझलखानापासून फाडून टाकू पर्यंत शेलकी विशेषणे देऊन टिकेच्या धारेवर धरले होते. सोमवारी जाहीर प्रचार करण्याची मुदत संपल्यानंतर देखील ठाकरे यांनी भाजपवरील आपली टिका थांबविली नसून भाजपला त्यांनी सत्तेचे भुकेलेले आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मेलेल्या सापांप्रमाणे वळवळणारे अशी आणखी खालच्या दर्जाची विशेषणे देऊन आपल्या मनातील राग व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने आम्हाला विचारले आहे की, शिवसेनेचा नक्की शत्रू कोण ? तर आम्ही त्यांना सांगतो की आम्हाला कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून कोणताही धोका नाही कारण ते मेलेले साप आहेत. परंतु, या मेलेल्या सापांपेक्षा जास्त वळवळ आमचे एकेकाळी मित्र असलेल्या भाजपच्या नेत्यांनी सुरु केली आहे, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. भाजप ही सत्तेची भुकेलेली संघटना आहे. त्यासाठी त्यांनी २५ वर्षांची युती तोडण्यास मागे-पुढे पाहिले नाही, असा मनस्ताप त्यांनी व्यक्त केला. अनेक राज्यातील खासदार भाजपने महाराष्ट्रात बोलविले आहेत. पंतप्रधान, गृहमंत्री आणि अनेक केंद्रीय मंत्री शिवसेनेला हरविण्यासाठीच प्रचारात उतरले आहेत, असा कांगावा देखील ठाकरे यांनी केला आहे. काल-परवापर्यंत मुलायमसिंह, लालूप्रसाद, भजनलाल असे लोक येऊन व्होटबॅंकेचे राजकारण करत होते. परंतु, आता संपूर्ण गुजरात महाराष्ट्रात उतरवून गुजराती मतदारांच्या मनात शिवसेनेबद्दल कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सामनाने म्हटले आहे. गुजराती समाजाची बाळासाहेबांवरील भक्ती कमी होणार नाही आणि ते सेनेला पाठिंबा देतील असा भाबडा आशावाद देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment