हरियानात मुख्यमंत्री हुडा संकटात

hariyana
महाराष्ट्राबरोबरच हरियाना विधानसभेचीही निवडणूक होत आहे. तिथे सध्या सत्तेवर असलेले कॉंग्रेसचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा हे गेल्या दहा वर्षांपासून या पदावर आहेत आणि सलग तिसर्‍यांदा निवडणूक जिंकून हॅटट्रिक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या या प्रयत्नाला सुरुंग लावण्यास मोदी लाट प्रयत्नशील आहेच, पण भूपिंदरसिंग हुडा यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराचे आरोप आणि सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वड्रा यांचा भूमी घोटाळा या दोन गोष्टी त्यांना मोठ्याच अडचणीच्या ठरत आहेत. खरे म्हणजे मोदी लाट आणि भ्रष्टाचार या दोन्हीतूनही वाट काढून हुडा यांना आपली नैय्या पार करता आली असती, परंतु त्यांना पक्षाच्या आतून विरोध होत आहे आणि त्या विरोधामुळे हुडा यांचा पराभव अर्थात हरियानातले सत्तांतर अटऴ ठरले आहे. त्यांच्या पक्षाचे नेते राव इंद्रजितसिंग आणि बिरेंद्रकुमार यांनी तर हुडा यांच्याशी असलेल्या मतभेदातून पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला आहे. कुमारी शैलजा आणि कॅप्टन अजय यादव हे दोन कॉंग्रेस नेते मात्र पक्षाच्या आत राहून हुडा यांच्या सिंहासनाला सुरुंग लावत आहेत.

दहा वर्षाची सत्ता, प्रस्थापित विरोधी भावना आणि पक्षातील मतभेद यामुळे कॉंग्रेस पक्ष पराभूत होऊन भाजपाची सत्ता येण्याचे संकेत मिळत आहेत. २००९ साली हुडा यांचे सरकार सत्तेवर आले होते, पण त्याचवेळी ते कसे बसे सत्तेवर आले होते. ९० सदस्यांच्या विधानसभेत हुडा यांना ४६ सदस्यांचे पाठबळ मिळाले नव्हते. त्यांच्या पक्षाचे केवळ ४० आमदार निवडून आले होते आणि केवळ सर्वात मोठा पक्ष म्हणून हुडा यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली होती. त्या निवडणुकीत त्यांनी हरियाना नंबर-१ या शीर्षकाखाली अतीशय आक्रमक जाहीरात मोहीम चालवली होती. तरी सुद्धा त्यांना स्पष्ट बहुमत मिळवता आले नव्हते. आता तर वातावरण विरोधात आहे. त्यामुळे पराभव ठरलेला आहे.

त्यांचा पराभव अटळ असल्याचे त्यांना स्वत:ला अंशत: मान्य आहे, परंतु आपला फार दारूण पराभव होईल असे त्यांना वाटत नाही. २००९ साली जिंकलेल्या ४० जागा आपण निश्‍चितपणे राखू असा त्यांचा विश्‍वास आहे. हरियानातल्या निवडणुकांमध्ये निर्णायक ठरणारी जाट समाजाची मते विभागली गेली आहेत. भारतीय जनता पार्टी आणि ओमप्रकाश चौटाला यांचा इंडियन नॅशनल लोकदल पक्ष यांची भिस्त जाट मतांवर आहे. कारण हा समाज मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांच्या ठाम विरोधात आहे. असे असले तरी जाट समाजाची मते या दोन विरोधकांत विभागली गेली असल्यामुळे आपल्या पक्षाचा विजय निश्‍चित होईल असा हुडांचा विश्‍वास आहे.

कॉंग्रेस पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत दारूण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने बहुतेक राज्यात नेतृत्व बदलाची प्रक्रिया सुरू केली आहे. राजस्थानात असा बदल करून अशोक गेहलोत यांच्या जागी सचिन पायलट यांना पुढे करण्यात आले आणि नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकांमध्ये सचिन पायलट यांनी चांगले यश मिळवून दाखवले. त्यामुळे नवे नेतृत्व पुढे आणण्यासाठी सगळ्या राज्यात प्रयत्न होण्याची शक्यता आहे. परंतु महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण यांनी आणि हरियानात भूपिंदरसिंग हुडा यांनी चांगले यश मिळवून दाखवले तर त्यांचे त्या त्या राज्यातले नेतृत्व टिकण्यास मदत होणार आहे. म्हणून भूपिंदरसिंग हुडा यांना विजय आवश्यक वाटतो. विधानसभेच्या निवडणुकीत आपला पराभव झाला तर राज्यातले कॉंग्रेसचे वर्चस्व तर कमी होणार आहेच, पण कॉंग्रेस पक्षातले आपलेही वर्चस्व घटणार आहे हे त्यांना समजते. म्हणून ते विजय मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

भारतीय जनता पार्टीने मात्र भूपिंदरसिंग हुडा यांचे सारे हिशोब धुळीला मिळविण्यासाठी कंबर कसून उभी आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातल्या दहा जागांपैकी सात जागा भाजपाला मिळालेल्या आहेत. त्यामुळे भाजपाची उमेद वाढली आहे. यापूर्वीच्या राजकारणात भारतीय जनता पार्टी ही हरियानातल्या राजकारणात फार मोठी शक्ती मानली जात नव्हती. कारण २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ ४ जागा मिळाल्या होत्या. आता मात्र ४ वरून ४४ वर उडी मारण्याची त्यांची महत्वाकांक्षा आहे आणि मोदी लाटेवर हा करिश्मा होईल असे त्यांना वाटत आहे. हरियानामध्ये इंडियन नॅशनल लोकदल हा जाट समाजाचे प्राबल्य असलेला पक्ष कॉंग्रेसविरोधी भावनेचा फायदा घेऊन जोर मारत आहे. परंतु या पक्षाचे नेते ओमप्रकाश चौटाला हे सध्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. त्यांच्या प्रतिमेचा दुष्परिणाम पक्षावर होऊ शकतो.

कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे चिरंजीव कुलदीप बिष्नोई यांनी हरियाना जनहित कॉंग्रेस हा पक्ष स्थापन करून सवतासुभा उभा केला आहे. पण त्यांचा फारसा प्रभाव पडणार नाही. तुरुंगात जाऊन आलेले कॉंग्रेसचे मंत्री गोपाल गोयल कांडा यांनीही एक पक्ष काढला आहे, परंतु तोही निष्प्रभ आहे.

Leave a Comment