११ कोटी ६ लाख ७२ हजार ६४० रुपये, दारू, गांजा जप्त

election1
नागपूर – एकीकडे विधानसभा निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला असतांनाच पैसे पाऊस आणि दारुचा महापूर येतांना दिसत आहे. आतापर्यंत निवडणूक आयोगाने ११ कोटी ६ लाख ७२ हजार ६४० रुपये जप्त केले आहेत. तसेच अनेक ठिकाणी अवैध दारू आणि गांजाही पकडला आहे. दरम्यान, नागपूरात गेल्या दोन दिवसांत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने दोन विविध घटनांत ८० लाख रुपये आणि ६ लाख रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. नागपूरच्या लकडगंज पोलिसांच्या हद्दीत क्वेटा कॉलनीजवळ ही घटना घडली आहे. पोलिसांनी विदेशी मद्याच्या तब्बल साडेचौदा हजार बाटल्या जप्त केल्या आहेत. एका मिनी-ट्रकमध्ये दारूचे ९८ खोके नेले जात असताना हा प्रकार उघडकीस आला.

दुसरीकडे नवी मुंबई पोलिसांनी गेल्या २४ तासात वेगवेगळ्या प्रकरणात एकूण तीन लाख ६८ हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघा जणांना अटक केली आहे. तसेच खारघर पोलिसांनी २ लाख ५० हजार रुपयांची रक्कम जप्त केली. ठाकूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या स्कॉर्पियो गाडीत ही रोकड सापडली. तर पनवेल पोलिसांनी एक लाख तीन हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. प्रकाश कामरे आणि रोहित यादव हे दोघे जण पाकिटात हजार रूपये घालून वाटत होते. अशी तब्बल १०४ पैशांनी भरलेली पाकिटे पोलिसांनी जप्त केली आहेत.

Leave a Comment