सप्टेंबर महिन्यात वाहनांच्या विक्रीत वाढ

car
नवी दिल्ली – देशातील एकूण वाहनांच्या विक्रीत सप्टेंबर महिन्यात २०.४४ टक्क्यांनी वाढ झाली असून या मागील वर्षीच्या १५,८०,९३३ वाहनांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी १९,०४,००७ वाहनांची विक्री झाली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्सतर्फे (सियाम) जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनंतर ही बाब स्पष्ट झाली आहे. सियामच्या आकडेवारीनुसार, मागील महिन्यात देशांतर्गत बाजारपेठेतील मोटारसायकलच्या विक्रीत १९.३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात देशात एकूण १०,५६,५०९ मोटरसायकलची विक्री झाली असून गेल्या वर्षी याच कालावधीत ८,८५,३०९ मोटरसायकलची विक्री करण्यात आली होती. तर एकूण दुचाकींच्या विक्रीचा विचार केला असता सप्टेंबर महिन्यात या विक्रीत २३.८१ टक्क्यांची वाढ झाली असून एकूण १५,६७,३५१ दुचाकींची विक्री झाली आहे. याशिवाय व्यावसायिक वाहनांच्या विक्रीचा विचार केला असता सप्टेंबर महिन्यात या श्रेणींच्या वाहनांच्या विक्रीत ८.५९ टक्क्यांची वाढ झाली असून एकूण ५६,१४० वाहनांची विक्री झाली आहे, असे सियामतर्फे सांगण्यात आले आहे. सियामने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील प्रवासी वाहनांच्या विक्रीत सप्टेंबर महिन्यात १.०३ टक्क्यांची घसरण झाली आहे. सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारपेठेत एकूण १,५४,८८२ प्रवासी वाहनांची विक्री करण्यात आली. गेल्या वर्षी याच कालावधीत १,५६,४९४ प्रवासी वाहनांची विक्री झाली होती.

Leave a Comment