संयुक्त राष्ट्रसंघाला काश्मिरप्रकरणी पाकिस्तानने लिहिले पत्र

uno
इस्लामाबाद – काश्मिरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिला जावा, याकरिताचे आपले प्रय़त्न अधिक तीव्र करताना पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळील परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. तसेच या मुद्द्याच्या निराकरणासाठी त्यांनी मून यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र प्रकरणी पाकिस्तानी पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अजीज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांना एक पत्र लिहून भारत विनाकारण गेल्या एका आठवड्यापासून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असल्याचा आणि सीमेवर गोळीबार करत असल्याचा आरोप केला आहे. अजीजद्वारे लिहिण्यात आलेले पत्र आज पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी तात्काळ तुमचे लक्ष पाकिस्तान आणि भारत आंतरराष्ट्रीय सीमेवरील तसेच जम्मू काश्मिर नियंत्रण रेषेजवळील सुरक्षा परिस्थितीवर वेधू इच्छितो. जसे तुम्हाला माहित आहे की, जम्मू काश्मिर वाद संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचा एक प्रलंबित मुद्दा राहिला आहे. ज्याच्या प्रस्तावात संयुक्त राष्ट्राने जनमत संग्रहित करण्याचे वचन दिले होते. सदर प्रस्ताव आजही वैध आहे कारण आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही. पाकिस्तान या परिसरात शांतता, सुरक्षेच्या हितासाठी संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय संघटनांना दशकांपासून या गोष्टींची आठवण करुन देत आहे, असे त्यांनी म्हटले. अजीज म्हणाले की, पाकिस्तानच्या मते, काश्मिरच्या मुद्द्याच्या निराकरणाच्या उद्देशात संयुक्त राष्ट्रसंघाची महत्वाची भूमिका आहे. भारताने नियंत्रण रेषेजवळील परिस्थिती बिघडवली असल्याचा आरोप अजीज यांनी केला आहे. तसेच वारंवार होणा-या गोळीबाराला पाकिस्तानमधील निष्पाप नागरिक बळी पडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताच्या शस्त्रसंधी उल्लंघनाला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने संयमाची भूमिका घेतलेली आहे, असे त्यांनी सांगितले. जम्मू काश्मिरमधील नागरिकांच्या इच्छेप्रमाणे जोपर्यंत या प्रश्नाचे निराकरण होत नाही, तोपर्यंत आम्ही या वादावर पडदा टाकू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.