विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या

vidhansabha
मुंबई – लोकसभा निवडणूकीनंतर प्रत्येक पक्षाची वाढलेली राजकीय महत्वाकांक्षा आणि स्वबळावर जिंकून येण्याची खुमखुमी यातून अभूतपूर्व युती-आघाडी तुटल्या. त्यानंतर स्वत:ची ताकद आजमावण्याच्या दृष्टीने अत्यंत चुरशीने लढवल्या जात असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा अखेर आज संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या.प्रथमच बहुरंगी होत असलेल्या या निवडणुकीचा प्रचारही रंगतदार झाला आहे. आधी पितृपक्ष आणि त्यानंतर आलेल्या सणांच्या कालावधीत यंदा प्रचाराला फारच कमी वेळ होता. मात्र तरी देखील आरोप-प्रत्यारोप, एकमेकांवर डागलेल्या तोफा आणि नेत्यांची घणाघाती भाषणे, जाहिरातींचा भडिमार यामुळे या निवडणुकीत कमी वेळातच प्रचाराचा मोठा धुराळा उडाला. या धुराळ्यात सर्वसामांन्यांचे प्रश्न मात्र बाजूला पडले. मात्र राजकीय टिकास्त्रांचा कलगीतुरा मतदारांना पाहायला मिळाला. केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचारात उतरवत भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचे स्पष्ट केले. मोदींसोबत भाजपने राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांची मोठी फौजच रणांगणात उतरवली.दुसरीकडे शिवसेनेनेही मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करत भाजपसह सर्वच पक्षांवर घणाघाती टिका करत जोरदारपणे प्रचार केला. उद्धव ठाकरेंनी राज्यभर सभा घेत शिवसेनेसाठी वातावरण तापवले.

लोकसभा निवडणूकीत मोदी त्सुनामीत वाहून गेलेल्या काँग्रेससाठी मात्र ही अस्तित्वाची लढाई आहे. सोनिया गांधींबरोबरच राहुल गांधींनीही प्रचारात भाग घेत लोकसभा निवडणूकीचा वचपा काढत नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा स्वत: शरद पवार यांनी हातात घेऊन ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी किती महत्वाची आहे हे दाखवून दिले.तर, आक्रमक शैली आणि राजकीय कोट्या करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या राज ठाकरेंच्या सभांनीही मनसेसाठी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला.प्रत्येक पक्षाने विजयाचा दावा केला असला तरी १५ ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानात मतदार कोणाला कौल देतात. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मतदारांचा कौल १९ ऑक्टोबरलाच स्पष्ट होईल.

दरम्यान आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या तोफा जोरदार धडाडल्या. यामध्ये कोकण पट्ट्यातील पालघर, रत्नागिरी, कणकवली मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, मुक्ताईनगर मतदारसंघात उद्धव ठाकरे, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रातील जुन्नर, श्रीगोंदा, दौंड, सासवडमध्ये शरद पवार, तर पुणे, वडगाव शेरी, खडकवासला, बारामतीमध्ये अजित पवार, कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण, मुंबईत राज ठाकरे यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी भाषणातून शेवटच्या दिवशीची अटीतटीची लढाई पार पाडली.

Leave a Comment