मोदींना मोफत सल्ला आणि गर्भित धमक्या

imran-khan
लाहोर – पाकिस्तानचे विरोधीपक्ष नेते आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मिर मुद्द्याच्या निराकरणासाठी जनादेशाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. खान यांनी एका विशाल सभेला संबोधित करताना म्हटले आहे की, मोदी यांना जनादेश मिळालेला आहे. त्यांनी काश्मिर मुद्दा सोडवण्यासाठी काम करायला हवे. उपखंडात मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. लढाई आणि हत्यारांवर पैसे वाया घालवण्यापेक्षा पाकिस्तान आणि भारताने गरिबी निर्मुलनासाठी प्रयत्न करायला हवेत. इम्रान खान पुढे म्हणाले की, मोदींना माझा एक मोफत सल्ला आहे. तुम्हाला लोकांनी बहूमत दिले आहे. तुम्ही काही लोकांकरिता सीमेवर जे काही करत आहात… तुमची विचार करण्याची पद्धत जर मोठी असती, तर तुम्ही काश्मिर प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले असते. काश्मिरमध्ये जी सात लाखांचे सैन्य तैनात केले आहे. त्याला परत बोलावले असते. सीमेवर शक्तीप्रदर्शन केल्याने काही कालावधीसाठी लोक खुश होतील. मात्र जगात एक मोठा नेता बनण्यासाठी आलेली संधी तुम्ही वाया घालवाल. तुमच्या देशात गरीब आणि श्रीमंतांमध्ये फरक आहे. आमच्या देशातदेखील आहे. सीमेवर शांतता राहिली असती, तर दोन्ही देशांनी हत्यारांवर पैसे खर्च केले नसते आणि गरिबांचे भले झाले असते. दोन्ही देशांनी शांतीसाठी काही उपाययोजना करायला हव्यात. याशिवाय आपआपसातील व्यापारदेखील वाढवायला हवेत, असे त्यांनी म्हटले आहे. इम्रान म्हणाले की, मी मोदींना सांगू इच्छितो की, सियालकोट सीमेवर जी तुम्ही तुमची शक्ती दाखवत आहात. तुम्हाला जर वाटत असेल की, पाकिस्तान तुम्हाला घाबरेल. तर त्या गैरसमजात राहू नका. आता पाकिस्तान बदलत आहे. नवीन पाकिस्तान तयार होत आहे, ज्याला कोणी टक्कर देऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

Leave a Comment