महिंद्राने घेतला ट्रॅक्टर उत्पादन थांबविण्याचा निर्णय

mahindra
नवी दिल्ली – महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीतर्फे ऑक्टोबर महिन्यातील चार दिवस कंपनीच्या रुद्रपूर आणि जयपूर येथील प्रकल्पातील ट्रॅक्टरचे उत्पादन बंद ठेवण्यात येणार आहे. मागणीत घट झाल्याने मागणी व उत्पादन यांमधील संतुलन राखण्यासाठी कंपनीतर्फे महिन्याला आढावा घेऊन उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येतो. त्याच योजनेतील एक भाग म्हणून या महिन्यातील चार दिवस ट्रॅक्टरचे उत्पादन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महिंद्राने मुंबई शेअर बाजाराला दिली. या निर्णयामुळे बाजारातील ट्रॅक्टरच्या उपलब्धतेवर परिणाम होणार नसल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात कंपनीने २८,७३९ ट्रॅक्टरची विक्री केली होती. गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील विक्रीच्या तुलनेत यंदाच्या विक्रीत ७.३९ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. असे असले तरी, यंदा मागणी तुलनेने कमी असल्याने ट्रॅक्टरचे उत्पादन चार दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात मागणी कमी झाल्याने कंपनीने सर्व वाहन प्रकल्पातील काम चार दिवस बंद ठेवले होते.

Leave a Comment